• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यावरील स्लॅब निकृष्ट दर्जाचा!

ByEditor

Jan 16, 2025

शहानिशा न करता कामाचा दर्जा चांगला असल्याचा रिपोर्ट

घनःश्याम कडू
उरण :
नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यावरील स्लॅब टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री कक्षाकडे तक्रारदारांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर चौकशी केल्याची नाटकबाजी करून सदरच्या कामाचा दर्जा चांगला असल्याचे सर्टिफिकेट राज्य गुणवत्ता निरीक्षक व्ही. एम. गायकवाड यांनी दिले. मात्र त्यांच्याकडे फोनद्वारे विचारणा केली असता मला माहित नसल्याचे उत्तर दिले. मग रिपोर्ट बनविला कसा? याचे उत्तर मिळत नाही. मात्र ही पहाणी करीत असताना तक्रारदाराला याची कोणतीही माहिती न देता परस्पर ‘ओके’ असल्याचा रिपोर्ट देऊन अधिकारी वर्ग आपली जबाबदारी झटकताना दिसतात. यामध्ये अधिकार्‍यांना मलिदा मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे.

काही महिन्या अगोदर ओएनजीसी प्लांटमधुन सांडपाणी व पावसाळी पाणी वाहुन नेणार्‍या नाल्यावर स्लॅब टाकणेकरीता ओएनजीसीकडुन करोडो रुपयांचा निधी नागाव ग्रामपंचायतला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदरचा नाला सन 2004 व 2019 ला मोठ्या आगीत सापडलेल्या नाल्याची संरक्षक भिंत पूर्णतः निकामी झाली असुन जिर्ण झाली आहे. 80 मिटर सुरक्षीत पट्टा हा गेल्या 30 वर्षांपासून रखडलेल्या प्रश्‍न व नागरिकांची सुरक्षितता प्रलंबित असताना ओएनजीसीने हा नाला पुर्ण दुर्लक्षित केला होता. तसेच सदर नाल्यात दोन ते तीन वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरच कोट्यवधी रुपये खर्च करून स्लॅब टाकण्यात आला आहे. मग सदर बांधकामाचा दर्जा चांगला कसा असू शकतो असा सवाल या निमित्ताने उभा रहात आहे. तरीही अधिकारी वर्ग सदरचे काम चांगले असल्याचा लेखी अहवाल देत आहेत.

सदर काम प्रत्यक्षात न पाहणी व मोजमाप करता पंचायत समिती बांधकाम अभियंता यांनी बोगस अंदाज पत्रक तयार करुन ग्रामपंचायत नागावने निवीदा काढताना सुध्दा चलाखी करीत ठेकेदारास 1% कमी करीत टेंडर देण्यात आले असल्याचे समजते. दस्तुरखुद्द नागावमधील काही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या कामात पार्टनर असल्याचे समजते. इंडियन कॉन्टॅक्ट ऍक्टचे उल्लंघन करीत काम सुरू आहे. ओएनजीसी मुख्य रस्त्यालगतच्या नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ओएनजीसीने दिलेला सीएसआर निधी वाया जाणार असल्याचे बोलले जाते. तरी याबाबत वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊन व माहितीच्या अधिकारात माहिती मागूनही ग्रामपंचायत ग्रामसेवक वेगवेगळी कारणे देऊन माहितीचा अधिकार निकाली काढत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.

उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक, सत्ताधारी यांच्या संगनमताने जिल्हा परिषद व उरण पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील इंजिनिअर अथवा इतर अधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता कार्यालयात बसूनच आर्थिक साटेलोट्यातून बिले पास करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करीत आहेत. यामुळे बांधकाम इंजिनिअर रेश्मा भोईर यांच्यावर लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तरीही उरण पंचायत समितीमधील कारभार सुधारताना दिसत नाही. अशा प्रकारच्या भ्रष्ट कारभाराबाबत अनेक जागृत नागरिकांनी लेखी तक्रारी करून चौकशीची मागणी करूनही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. उलट जे ग्रामसेवक किंवा इतर वरिष्ठांच्या मागण्या पूर्ण करीत नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा प्रकार सुरू आहे.

तरी सदरच्या नाल्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यामध्ये पंचायत समिती बांधकाम विभागाचे येथील इंजिनिअर व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ इंजिनिअर तसेच ग्रामपंचायत यांच्या संगनमताने दडपशाही करून काम सुरू आहे. तरी याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येऊन सदरचे काम त्वरित थांबवून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकून सदरच्या कामाचे बिल अदा करु नये अशी मागणी तक्रारदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी उरण यांच्याकडे केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!