• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडवर भाजपाचा झेंडा फडकणार -खासदार धैर्यशील पाटील

ByEditor

Jan 19, 2025

मिलिंद माने
मुंबई :
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भाजपाने सदस्य नोंदणी अभियान चालू केले आहे. या नोंदणीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, महाड, कर्जत, श्रीवर्धन या सातही विधानसभा मतदारसंघात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेसह नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्यासह रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार दक्षिण रायगड भाजपा अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे खासदार झाले. तर रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेल, उरण व पेण हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे कायम ठेवले तर अलिबाग, महाड कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेने आपल्याकडे कायम ठेवले. एकमेव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे कायम राहिला आहे.

राज्यात मागील पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे प्रलंबित राहिल्या असून २२ जानेवारी रोजी याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी असून या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागून निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाने रायगड जिल्ह्यावर आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी भाजपा सदस्य नोंदणी मोहीम चालू केली आहे.

रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील व उत्तर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्ह्यातील भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला गांभीर्याने घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी मोहीम जोमाने चालू केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून भाजपा सदस्य नोंदणीला रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत, अलिबाग व महाड या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे आमदार निवडून आले होते. मात्र २०२२ मध्ये झालेल्या शिवसेना पक्ष फुटीनंतर तिन्ही आमदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २०२४च्या विधानसभा निवडणुकीत देखील सावरू शकला नाही. परिणामी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याच पद्धतीने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदार आदिती तटकरे या अजित पवार गटात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था देखील जिल्ह्यात तशीच झाली आहे. यामुळे शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांना सध्या वाली राहिला नसल्याने किंबहुना पक्षाच्या वरिष्ठांनी देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नाराज झालेले शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटापेक्षा भाजपाकडे जाणे पसंत केले असून लवकरच जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडणार असल्याचे संकेत प्राप्त होत असून याचाच फायदा भाजपाने उचलण्यास सुरुवात केली असून यानिमित्ताने सदस्य नोंदणी मोहीम प्रक्रिया रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात चालू केली आहे. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर व दक्षिण रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील हे गावोगावी जाऊन मेळावे आयोजित करून भाजपात सामील होण्याबाबत कार्यकर्त्यांना व पक्षात सामील होणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू केल्याने रायगड जिल्ह्यात लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार पडणार असून यामुळे त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेसह पनवेल, उरण, पेण, अलिबाग, महाड, कर्जत, श्रीवर्धन या सातही विधानसभा मतदारसंघातील नगरपरिषदा, नगरपंचायती त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काळात होणार असल्याने त्या निवडणुकीवर भाजपा आपले उमेदवार उभे करून ते उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांची फौज ग्रामीण भागात तयार केली आहे. यानिमित्ताने रायगड जिल्हा भाजपामय करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी दक्षिण रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगडमध्ये शतप्रतिशत भाजपा मोहीम चालू केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!