• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोठी बातमी, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

ByEditor

Jan 20, 2025

मुंबई : बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे.

अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालात म्हटल्याप्रमाणे, अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!