कर्जत : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्विकारणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य रायगडमधील कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. रायगडचे पालकमंत्री पद जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या एकमेव निवडून आलेल्या आदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी काल पासून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. थोरवे यांनी पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा स्वरूपातील वक्तव्य केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या उठावात रायगडच्या आमदारांचा मोठा वाटा आहे. सुरु असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याच काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्या नेतृत्वात आम्ही होतो. खरतर मागच्या वेळेस मंत्रिपदाचे दावेदार असताना भरत गोगावले यांनी संघटनेला बळ देण्यासाठी मागच्या वेळेस मंत्रिपदाचा त्याग केला. खर त्यावेळेस भरत गोगावले पालकमंत्री झाले असते असे थोरवे म्हणाले. राज्यात सरकार येण्यासाठी आम्ही जो उठाव केला आणि जे काही परिवर्तन झालं त्यामुळेच सरकार बसल्याचे थोरवे म्हणाले. खातं कोणतं दिलं यांबाबत मी काहीच बोलणार नाही. परंतू, भरत गोगावले यांना कॅबिनेटमंत्री केलं तेव्हा आमची सर्वांची एकच मागणी होती की पालकमंत्री देखील गोगावले यांनाचं दिले पाहिजे. आघाडी सरकार असताना उध्दव ठाकरे यांनी सेनेचे 3 आमदार असताना चुकीचा निर्णय घेतला होता. त्याविरोधातही आम्ही उठाव केला होता असे थोरवे म्हणाले.
राज्यात बहुमताने सरकार स्थापन झाले परंतु भाजप आणि सेनेचे तीन तीन आमदार असताना सुध्दा गोगावले यांना का डावललं? असा सवाल यावेळी थोरवे यांनी केला. गोगावले यांना पालकमंत्री करण्याची आमची सर्वांची मागणी असताना सुध्दा असा निर्णय का घेण्यात आला? असा सवाल थोरवे यांनी केला. फडणवीस आणि शिंदे साहेब यांना आम्ही एकमताने भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाबाबत सुध्दा सांगितलेलं असताना असा निर्णय अपेक्षित नव्हता असे थोरवे म्हणाले.
