घन:श्याम कडू
उरण : आज सकाळी ११ वाजल्यापासून उरण चारफाटा येथे असलेल्या अनधिकृत टपरी धारकांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या पथकातर्फे कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाने पोलीस व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन तीन जेसीबीच्या साहाय्याने कारवाईस सुरुवात केली. यामध्ये फेरीवाल्यांच्या हातगाडी व टपरी यावर कारवाई करून त्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

आज जरी सिडको अतिक्रमण विभागाने कारवाई केली असली तरी काही तासांतच पुन्हा ‘जैसे थे’ अशी परिस्थिती होत रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान बसल्याचे चित्र अनेकवेळा पहावयास मिळत आहे. सिडको अतिक्रमण विभाग कारवाई करताना लाखो रुपये खर्च करूनही पुन्हा पुन्हा अनधिकृत फेरीवाले बस्तान मांडत आहेत. तरी सिडकोने कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याठिकाणी अनधिकृत साम्राज्य उभे राहू नये याकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे. अन्यथा कारवाईच्या नावाखाली अनेकवेळा लाखों रुपये पाण्यात जाऊन वारंवार कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.

