प्रतिनिधी
मुरुड : मुरुड तालुक्यात दि. 15 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्राची नेहुलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील पहिलीच नववर्षातील तालुकास्तरीय कुष्ठरोगबाबत कार्यशाळा पार पडली.

शाश्वत विकास ध्येय अंतर्गत सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार विविध रणनीती वापरून काम करण्यात येत आहे. “राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन” कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या 14 दिवसाच्या कालावधी दरम्यान ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान’ ( LCDC) राबविण्यात येणार आहे. ह्यावेळी डॉ. पायल राठोड यांनी अभियानाचे उद्दिष्ट सांगुन जास्तीत जास्त समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित औषधोपचाराखाली आणणे, नविन सांसर्गिक कुष्ठ रुग्ण शोधून संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे तसेच मोठ्या प्रमाणात विविध पातळीवर कुष्ठरोग विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट राबविण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. या प्रसंगी सहाय्यक संचालक डॉ. प्राची नेहुलकर यांनी सर्व उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेतले. आशा व पुरुष स्वयंसेवक कर्मचारी यांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सचिन संकपाळ यानी घरोघरी सर्वेक्षण करून गृह भेटीतील कुटुंबातील सदस्यांची तपासणी कशी करावी याबाबतची माहिती दिली.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. कोकाटे सर, अवैद्यकीय सहाय्यक भगवान जाधव, निम वैद्यकीय कर्मचारी मयुरी कदम तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी कार्यशाळेस उपस्थित होते.
