एखाद्या निष्पापाचा नाहक बळी गेल्यानंतरच खड्डा भरणार का? प्रवाशांचा संतप्त सवाल
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशालाच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने सर्वजण थोडक्यात बचावले. परंतु, एखाद्या निष्पाप प्रवाशाचा नाहक बळी गेल्या नंतरच हा खड्डा भरला जाईल का? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
कोलाड बाजुकडून रोहा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला काही दिवसापूर्वी या मार्गावरील प्रचंड मोठया प्रमाणात असणाऱ्या रहदारीमुळे मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना खबरदारी घ्यावी लागत आहे. शिवाय कोलाड बाजारपेठेत उड्डाण पुलाचे काम सुरु असल्यामुळे महाडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक याच बाजूच्या रस्त्यावरून सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गवरील आंबेवाडी (कोलाड) हे मध्यवर्ती ठिकाण असुन कोलाड बाजारपेठेत या परिसरातील अनेक गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी ये-जा करीत असतात. तसेच धाटाव एमआयडीसीकडे जाणारे कामगार, तसेच रोहा, अलिबाग, मुरुडकडे जाणारे प्रवाशी याच मार्गाने प्रवास करीत असतात. यामुळे येथे वाहनांची प्रचंड वर्दळ सुरु असते. या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहे.
खांब, माणगाव व सुतारवाडी या तीनही बाजुकडून रोहा बाजूकडे जाणारी वाहने याच मार्गावरून जात असतात. येथे कोलाड वाहतूक पोलिस व ट्रॉफीक वार्डन वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभे असतात. परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे खड्डा चुकविण्याच्या नादात घाईगडबडीने वळसा घालतांना काही वेळा ही वाहने वाहतूक पोलिस व ट्रॉफीक वार्डन यांच्या अंगावरही जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर संबंधितांनी लक्ष देऊन हा खड्डा सिमेंटकाँक्रीटने भरण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे.
