विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील कांदळे गावाचे पोलीस पाटील मनोहर तुकाराम मोते यांची कन्या समृद्धी मनोहर मोते हीने महाराष्ट्र राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिसरे स्थान पटकावत कास्य पदकाची मानकरी ठरली आहे.
समृद्धी मोते ही कांदळे गावाची रहिवाशी असुन ती पुई कोलाड येथे वास्तव्यास आहे. समृद्धी नागोठणे येथील कोएसो आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाची विद्यार्थीनी असुन ती तृतीय वर्ष बीएस्सी या वर्गात शिकत आहे. तिने राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत कास्य पदक पटकावून आपल्या महाविद्यालयाच्या नावलौकिकामध्ये भर टाकली आहे.
समृद्धी मोते हिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, माणगाव येथे पार पडलेल्या १७व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेनिमित्ताने रायगड झोनमधुन मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. तिने पर्यावरणपूरक औषधी वनस्पतीपासून तयार केलेली पावडर प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय होऊ शकते यावर संशोधन केले आहे. अतिशय दुर्गम भागातील मुलगी ही संपुर्ण महाराष्ट्रातुन पहिल्या तीनमध्ये येणे हि फार मोठी कौतुकास्पद बाब आहे. परंतु एवढी मोठी गरुड झेप मध्यम वर्गीय समृद्धी मोतेने घेतली असुन तीचे या यशाबद्दल विविध स्थरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
