• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी!

ByEditor

Jan 22, 2025

सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची सरकारकडे मागणी

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील पुनाडे येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पनवेल येथील अभियंता हेमंत नागदे, उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

उरण पुर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोण, कडाप्पे, आवरे, गोवठणे, पाले या गावातील जनतेला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या देखरेखीखाली सुमारे १० कोटी ८९ लाख १८ हजार रुपये (केंद्र ५ कोटी ४४ लाख ५९ हजार ००३-५ रु. तसेच राज्य ५ कोटी ४४ लाख ५९ हजार००३-५ रु.) खर्चाची पुनाडे नळ पाणी पुरवठा योजना सन २०२२ साली मंजूर करण्यात आली. सदर योजनेचे काम हे मे. गोरुर इन्फ्रा प्रा. लि. नवीमुंबई या नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु सदर योजनेच्या कामाची मुदत ही १९/७/२०२४ या वर्षात संपत असतानाही आतापर्यंत ५ उंच पाण्याच्या टाक्यांसह इतर कामे रेंगाळत पडलेल्या अवस्थेत आहेत. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने यश इंजिनिअरिंग कं. प्रा. लि. यांची नियुक्ती केली. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पनवेल येथील अभियंता हेमंत नागदे व उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्या ‘हम करो सो कायदा’ या तत्वामुळे सदर योजनेबरोबर उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवनचीही योजना बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे.

एकंदरींत अशा कामचुकार अधिकाऱ्यांमुळे शासनाचा निधी वाया जाऊन या परिसरातील २५ हजार रहिवाशांवर पाण्याचे संकट ओढवणार असल्याने सामाजिक कार्यकर्ते ॲड. सत्यवान भगत, पिरकोण गावचे उपसरपंच दिपक पाटील यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनीही संबंधित विभागाचे अधिकारी वर्गाकडून माहिती घेऊन पुनाडे व चाणजे या दोन योजनेचे काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पनवेल येथील अभियंता हेमंत नागदे, उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे हे ठेकेदारांची पाठराखण करत योजनेचे काम संथगतीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेत असतील तर अशा अकार्यक्षम अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी मागणी सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सादर केलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पुनाडे व चाणजे नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी जातीने लक्ष केंद्रित केले आहे. यासंदर्भात उरण पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक नुकतीच पार पडली आहे. पुनाडे योजने संबंधित ठेकेदाराला झालेल्या कामासंदर्भात या अगोदर ७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जे काम पुर्ण होणार नाही त्या कामाचा उर्वरित निधी ठेकेदाराला देण्यात येणार नाही
-नामदेवराव जगताप
उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग पनवेल

आज सरकार जनतेसाठी विविध योजना राबवित आहे. परंतु मंत्री महोदयांची वचक संबंधित अधिकारी वर्गावर राहिली नसल्याने आज तरी उरण तालुक्यातील पुनाडे व चाणजे सह इतर ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजनेची कामे रेंगाळत पडली आहेत. तरी केंद्र व राज्य सरकारने जनहिताच्या कामात जो अधिकारी चालढकलपणा करुन ठेकेदाराला पाठिशी घालत असतील तर त्या अधिकाऱ्यावर, ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.

-दिपक पाटील
उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते, पिरकोण-उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!