अलिबाग: चिरनेर येथील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यु H5N1 या रेागासाठी होकारार्थी आढळून आल्याने बाधित केंद्रापासून १ किमी त्रिज्येच्या परिघास जिल्हाधिकारी, रायगड यांनी बाधित क्षेत्र घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
२०२१ च्या एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार बाधित क्षेत्रातील एकूण १ हजार २३७ पक्षी शास्त्रीय दृष्ट्या नष्ट केले आहेत. तसेच एकूण १७७ अंडी व २७० किग्रॅ खाद्य, ५० किग्रॅ तुस नष्ट केले आहेत. बर्ड फ्ल्यु या रोगाची तिव्रता व गंभीरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात क्षेत्रीय स्तरावर आल्या आहेत.
पशुसंवर्धन आयुक्त यांनी कोणत्याही पक्षांमध्ये अचानक मोठया प्रमाणावर मर्तुक झाल्यास आयुक्तालय व राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग, पुणे यांचेकडे तात्काळ माहिती देण्याचे सुचीत केले आहे. कुक्कुट प्रक्षेत्रावर चोख जैवसुरक्षा ठेवणे, या रोगाबद्दल जनजागृती करणे, दैनंदीन अहवाल सादर करणे इ. बाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांना सुचीत करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाने राज्यात बर्ड फ्ल्यु रोग प्रादुर्भाव झाला असला तरीही ह्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षते संदर्भात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. आजमितीस राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमधून पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू रोगामुळे मरतुक आढळलेली नाही.
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
कोठेही पक्षांमध्ये मरतूक असल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, असे आवाहन डॉ. प्रवीणकुमार देवरे आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
पोल्ट्री फार्म साठी जैवसुरक्षा बाबत मार्गदर्शक सूचना
१) देशभरातील सर्व पोल्ट्री फार्मरनी पक्षांच्या आरोग्यासाठी मुलभूत स्वच्छता विषयक अटींचे पालन करणे गरजेचे आहे. यामधूनच स्वच्छ व आरोग्यदायी उत्पादने मिळू शकतात.
२) रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वव्यापी जैवसुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, रोगांचे सर्वेक्षण करणे, फार्मवरील नियमीत कामाचे मूल्यमापन करणे इ. आवश्यक आहे.
३) बर्ड फल्यू सारख्या रोगांच्या यापूर्वी झालेल्या प्रादुर्भावांपासून बोध घेऊन यापुढे अशा प्रकारच्या आपत्ती उद्भवणार नाही याकरिता चोख जैवसुरक्षा प्लॅनची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
४) या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्वच्छता, वाहतूक, मलमूत्र व्यवस्थापन, मृत पक्ष्यांची विल्हेवाट, खाद्य सुरक्षा, उपचार, लसीकरण, योग्य रोग नमूने गोळा करणे इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
५) क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांनी पोल्ट्री फार्मस्वर जैवसुरक्षा खात्री करण्याकरीता २०१५ चा बर्ड फल्यू अॅक्शन प्लॅन, Prevention & Control of Infectious & Biomedical Waste Rules, १९९८, Prevention & Control of Infectious & Contagious Diseases in Animals Act, २००९ या मध्ये सूचीत केल्याप्रमाणे कार्यवाही करीत असल्याची खात्री बाळगावी.
६) एखादया फार्मवर वन्यपक्षी/कावळे इ. मध्ये मरतूक आढळल्यास फार्मवर त्यांचे शवविच्छेदन करु नये. विभागीय/राज्य स्तरीय/जिल्हास्तरीय प्रयोगशाळेस त्वरीत सूचना द्याव्यात.
७) अशा प्रयोगशाळांनी नियमाप्रमाणे निदाना करीता नमूने गोळा करुन आवश्यकते प्रमाणे कार्यवाही करावी. बर्ड फल्यू रोगासाठी संशयीत नमूने HSADL प्रयोगशाळा, भोपाळ येथे पाठवावेत. अन्य आजारांसाठी नियमाप्रमाणे रोग निदानाची कार्यवाही करावी.
८) संशयीत/प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरुन पक्षांची वाहतूक, विक्री/खरेदी, खाद्य वाहतूक पूर्ण थांबवावी.
९) फार्मवर जैव सुरक्षेबाबत सूचना चिन्हांचा प्रभावीपणे वापर करावा.
१०) अशा प्रकारे पोल्ट्री फार्मवर जैवसुरक्षा उपाययोजना करुन पक्षांना रोगांपासून व या रोगांचे मानवास होणाऱ्या संक्रमणापासून वाचवणे शक्य होईल. देशभरातील सर्व फार्मनी अशा प्रकारची कार्यवाही चोखपणे केल्यास निरोगी, सुरक्षीत व निकोप कुक्कुट पालन करणे साध्य होईल.
११) संपुर्ण मार्गदर्शक सूचनांसाठी केंद्र शासनाचे संकेतस्थळ www.dahd.nic.in यावर भेट द्यावी.
