अनंत नारंगीकर
उरण : उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. यामध्ये गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाची संख्या अधिक आहे. मात्र तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूची साथ आल्याने परिसरातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तपासणी न करता आज गावठी कोंबड्या मारल्या जात आहेत. बाजारभावाप्रमाणे मिळणारा दर गोरगरीब कुक्कुटपालकांना शासनाच्या माध्यमातून मिळणार नसल्याने कुक्कुटपालक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

उरण तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी व वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. पूर्वी फक्त घरोघरी गावठी कोंबड्या पाळल्या जात होत्या. मात्र आता या घरगुती व्यवसायाला भातशेतीला जोडधंदा म्हणून व्यवसायिकरणाचे रूप देऊन कुक्कुटपालन हा व्यवसाय वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे उरण तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गावठी कोंबड्यांचे संवर्धन करून कुक्कुटपालन करण्यासाठी आपले स्वखर्चाने छोट्या स्वरूपात पोल्ट्री फार्म बांधले आहेत. बॉयलर कोंबड्यांपेक्षा गावठी कोंबड्यांची वाढती मागणी व पोषकता पाहता या कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन उरण तालुक्यातील अनेक गावात होत आहे. एका कोंबडी मागे पाचशे ते एका कोंबड्या मागे सातशे रुपये कुक्कुटपालकांना मिळत असतात. अनेकजण घरगुती कुक्कुटपालन देखील करतात. कोणत्याही प्रकारचे बाजारातले खाद्य न देता गावठी पद्धतीचे खाद्य या कोंबड्यांना दिले जाते. त्यामुळे या कोंबड्या अत्यंत चविष्ट लागतात.
मात्र पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षामुळे काही दिवसापूर्वी चिरनेर गावात बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे कोंबड्या मृत पावल्याची बाब समोर आली. याची दखल शासनाने घेऊन कोणत्याही प्रकारे इतर शेतकऱ्यांच्या कोबड्यांची तपासणी न करता गावातल्या कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई शासनस्तरावर सुरू केली आणि मारलेल्या कोंबड्यांसाठी शासनाच्या माध्यमातून १३७ रुपये नुकसान भरपाई दर शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले. एकंदरीत ज्या कोंबड्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे ४०० ते ७०० रुपयांपर्यंत आहे त्या कोंबड्यांना इतका अल्प दर देऊन त्या कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
तरी शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील, पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांची तपासणी करून सदर कोंबडीला बर्ड फ्ल्यू सारख्या आजाराची लक्षणे दिसून येतात का याची चाचपणी करुन बर्ड फ्ल्यू पॉजिटीव्ह कोंबड्या माराव्यात, परंतु निरोगी, निष्पाप कोंबड्यांचा नाहक बळी शासनाने घेऊ नये अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकरी करत आहेत. निष्पाप कोंबड्यांचा नाहक बळी घेणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारतील अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.
