प्रतिनिधी
नागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि महिला विकास कक्षातर्फे को. ए. सो. कै. अमरचंद.जेठमल जैन प्राथमिक शाळा नागोठणे, येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबई फुले यांच्या प्रतीमेस प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून झाली. नंतर, डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. दिनेश भगत यांनी सावित्रीबाईंचे कार्य व शिक्षणाचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांकडून कविता, पाढे म्हणून घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदेश गुरव ह्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. याप्रसंगी रसायनशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, महिला विकास कक्षाच्या डॉ. स्मिता चौधरी उपस्थित होते.

साहित्य वाटपानंतर महाविद्यालयाच्या १५ विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग, तसेच प्राणीशास्त्र प्रयोगशाळेत जतन करून ठेवलेले विविध दुर्मिळ प्राणी मुलांना दाखवले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे होता. ह्यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी अनुक्रमे कु .साहील घरत, कु. श्रावणी मांडवकर, कु. शिवानी कामथे, कु .सानिका घासे. कु .रसिका कदम, कु. पायल गुप्ता आदी उपस्थित होते. सदर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण तुपारे, महिला विकास कक्ष प्रमुख डॉ. स्मिता चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाअतंर्गत १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ह्या उपक्रमावेळी प्राथमिक शाळेच्या राजश्री शेवाळे, विजया पिंगळे आणि राहुल भवर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका अनघा लोखंडे यांनी आभार व्यक्त केले.
