घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाच्या भोवती उभारण्यात आलेला कठडा कोसळला आहे. सदर कठडाचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पुन्हा एकदा कठडा कोसळल्याने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे उघड होत आहे. अशा प्रकारची अनेक कामे निकृष्ठ होत आहेत. याबाबत तक्रारी करूनही बांधकाम विभाग हे ठेकेदाराशी असलेल्या मिलीभगतमुळे कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळे तलावात सकाळी व संध्याकाळी चालला येणाऱ्या रहिवाशांची कुचंबणा होताना दिसत आहे.
उरण शहरातील विमला तलावात जनतेला व छोट्या मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी, महिला वर्ग मॉर्निंग वॉक करण्यासाठी येत असतात. तसेच काहीजण जवळचा मार्ग ये-जा करण्यासाठी याचा वापर करीत आहेत. तर लहानमुळे खेळण्यासाठी येत असतात. परंतु, हा कठडा दोन दिवसांपूर्वी कोसळला आहे. त्यामुळे संपर्क तुटत पूर्णपणे तलावाला वळसा मारुन जावे लागत आहे.
सदर कठडा हा काही महिन्यांपूर्वी ही असाच कोसळला होता. त्यावेळी काही दिवसांनी हा दुरुस्त करण्यात आला होता. परंतु सदरचा कठडा पुन्हा काही महिन्यात कोसळल्याने ठेकेदाराने सदरचे काम हे निकृष्ठ दर्जाचे केल्याचे उघड होत आहे. याची कोणतीही चौकशी नगरपालिका बांधकाम विभाग न करता पुन्हा एकदा लाखो रुपयांचा ठेका मंजूर करून आपला स्वार्थ साधून घेतील अशी चर्चा जनतेत सुरू आहे. तरी सदरच्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा अन्यथा पुन्हा काही दिवसांनी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच विमला तलावातील मॉर्निंग वॉक करण्यासाठी जी साहित्य लावण्यात आली होती, त्यातील अनेक खेळणी, साहित्य वर्षभरापासून नादुरुस्त झाली आहेत. याचीही तक्रारी करून नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
