रायगड : जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरू झालेला वाद आता आणखी विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. अदिती तटकरेंच्या पालकमंत्रिपदाला विरोध करतानाच शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंना थेट लक्ष्य केलं आहे. आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा दळवींनी दिला आहे. तर शिंदे साहेबांनी थ्री एडियट्सला आवर घालावा, असं म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथे स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचे उद्घाटन प्रसंगी पुन्हा एकदा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. लोकसभेला आम्ही सगळ्यांनी सुनील तटकरे यांचे प्रामाणिक काम केलं होतं. खरंतर सुनील तटकरे यांच्याबद्दल आमच्या मनात निगेटिव्हिटी होती. परंतु आम्ही त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह होऊन त्यांना निवडून दिलं. परंतु नेहमीप्रमाणे सुनील तटकरे यांनी त्यांची रणनीती तयार करून आम्हाला दगा दिला. सुनील तटकरे यांनी आतापर्यंत लोकांना फसवण्याचाच धंदा केला. आता तटकरे यांच्या विरोधात एकच मोहीम सुरू झालेली आहे ती म्हणजे तटकरे हटाव मोहीम. येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराच दळवी यांनी दिला.
राष्ट्रवादीचा पलटवार
रायगडमध्ये शिवसेनेचे ३ आमदार आहेत. भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असे ३ आमदार असूनही केवळ १ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद मिळाल्यानं सेनेच्या गोटात नाराजी आहे. तटकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेच्या तीन आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लक्ष्य केलं आहे. सेनेच्या तीन आमदारांचा उल्लेख त्यांनी थ्री इडियट्स असा केला. ‘माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या थ्री इडियस्टला जरा आवर घालावा. यांच्यामुळे युतीत मिठाचा खडा टाकू नये,’ असं चव्हाण म्हणाले.
‘महेंद्र थोरवे यांनी त्यांचा राजकीय अस्त करायचा असेल तर खुशाल करुन घ्यावा. तटकरे साहेब काय आहेत हे त्यांना चांगले माहीत आहे. ते कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहेत माहीत नाही. पण गुवाहाटीला टेबलावर नाचायचा व्हिडीओ पाहिला तर भरत शेठ गोगावलेंना सांगा, हातात घेऊन फिरणारा गमछा जरा तोंडावर टाका. तोंडाला आवर घाला,’ असा टोला चव्हाण यांनी हाणला.