वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोयरसुतक नाही
घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिका हद्दीत भाड्याच्या जागेत असलेले पोस्ट कार्यालय हे अत्यंत जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये सुरू आहे. या इमारतीमधील अनेक रहिवाशी स्थलांतरित झाले आहेत. मात्र पोस्ट कार्यालयाला वारंवार नोटीस, सूचना देऊनही वरिष्ठ अधिकारी वर्ग याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. लवकरच सदर इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यावेळी वीजपुरवठा व पाणीपुरवठाही खंडित केला जाणार आहे. तरी पोस्ट कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची खबरदारी घेऊन त्वरित कार्यालय स्थलांतरित करावे अन्यथा होणाऱ्या दुष्परिणामास सोसायटी जबाबदार रहाणार नाही से सोसायटीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
नगरपालिकेने धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. पैकी शहरातील गिरीराज सोसायटीच्या इमारतीमध्ये पोस्टाचे कार्यालय सुरू आहे. इमारतीमधील अनेक रहिवाशांनी धोकादायक इमारतीमधून स्थलांतर केले आहे. मात्र पोस्ट कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी पोस्ट कार्यालयाचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदर इमारत नगरपालिकेने धोकादायक जाहीर करून पोस्ट कार्यालयाला वारंवार नोटीस देऊनही गेंड्याच्या कातडीचे वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाचीही पर्वा न करता कार्यालय धोकादायक इमारतीमध्ये सुरू ठेवले आहे. यामुळे कर्मचारी वर्ग जीवावर उदार होऊन काम करीत आहे.
इमारतीमधील काही ठिकाणचा भाग अचानक वारंवार कोसळत आहे. पोस्ट कार्यालय उघडल्यानंतर जनतेची गर्दी होते, विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची जास्त गर्दी दिसते. पोस्टाचे दर कमी असल्याने मनिऑर्डर, रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, बचत खाते, साधारण पोस्टसाठी जनतेचा ओढा वाढत चालला आहे. उरण शहरात गिरीराज सोसायटीच्या इमारतीत पोस्ट कार्यालय कार्यरत आहे. सदर इमारत धोकादायक झाली असल्याने नगरपालिकेने तसे जाहीर करून सोसायटीला लेखी पत्र देऊन त्वरित खाली करण्यास सांगितले आहे.
येत्या काही दिवसात इमारत जमीनदोस्त करून नव्याने उभारणी करण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी इमारतीचा वीजपुरवठा व पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यानंतर पोस्ट कार्यालय व ग्राहकांची कुचंबणा होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पोस्ट कार्यालय स्थलांतर करणे गरजेचे बनले आहे.
सोसायटीने त्वरित या पत्राची दखल घेऊन कार्यवाहीस सुरवात केली. त्याआधी इमारतीमधील काही भागांना चिरा गेल्या आहेत, तर काही ठिकाणचा स्लॅब पडला आहे. यामुळे सोसायटीमधील बहुतांश सदनिका धारकांनी सदनिका खाली केल्या आहेत. काही महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही पोस्ट कार्यालय स्थलांतरित न झाल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी व ग्राहक जीव मुठीत धरून येत असतात. याची दखल न घेतल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला गिरीराज सोसायटी जबाबदार न रहाता पोस्ट कार्यालय जबाबदार राहील, असे सोसायटीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.