कोलाड पोलिसांच्या प्रयत्नाने वाहतूक नियंत्रणात
विश्वास निकम
कोलाड : शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तसेच लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे हजारो चाकरमानी गावाकडे निघाले असुन यामुळे कोलाडमधील अपुऱ्या रस्त्यामुळे एक ते दोन तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली, परंतु कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस, वाहतूक पोलिस तसेच ट्राफिक वॉर्डन यांच्याकडून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर शनिवार, दि. ८ फेब्रुवारी ते रविवार ९ फेब्रुवारी रोजी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य चाकरमानी गावाकडे निघाले असुन कोलाडमधील अपुऱ्या रस्त्यामुळे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे प्रवाशी वर्गाचा खोळंबा झाला. दोन दिवस सुट्टी असल्यामुळे हजारो चाकरमानी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळ किंवा लग्नासाठी टुव्हीलर, रिक्षा, फोर व्हीलर, एसटी बस, खाजगी बस यामधून गावाकडे निघाले असून कोलाड येथील बाजारपेठेत १८ वर्षानंतरही अजून सिंगल रस्ता असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागली. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी वर्गाचा खोळंबा झाला, परंतु कोलाड पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीतपणे सुरु झाली.
