• Sun. Jul 20th, 2025 5:37:17 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य महत्वाचे

ByEditor

Feb 11, 2025

स्त्रीरोग तज्ञ सोनाली करंबे यांचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गणेश प्रभाळे
दिघी :
शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुला -मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. विद्यार्थ्यांना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान व आरोग्य विषयक माहिती असणे आवश्यक आहे. शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन म्हसळा येथील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सोनाली जुन्नरकर – करंबे यांनी केले. त्या वडवली येथील पीएनपी शाळेत आयोजित ‘मानसिक आरोग्य व लैंगिक शिक्षण’ या कार्यशाळेत बोलत होत्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापिक नितीन मोकल, पीएनपी शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत बिराडी व आगरी समाज अध्यक्ष श्याम धुमाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ करंबे यांनी बोलताना सांगितले कि, दहा ते अठरा वर्षात शारीरिक, मानसिक आणि भावनिक व सामाजिक बदल म्हणजे पौगंडावस्थ. हि हळूहळू पण प्रत्येकात होणारी गोष्ट आहे. या दरम्यान शरीरासाठी तुम्ही करू शकता ती सर्वोत्तम गोष्ट म्हणजे शरीराची काळजी घेणे.

मुलामुलींमध्ये शारीरिक बदल, त्याची समज व जबाबदारी तसेच स्वतःच्या शरीरावर स्वतःचाच अधिकार असल्याची जाणीव यावेळी डॉक्टरांनी पटवून दिली. या अवस्थेत शारीरिक वाढ होताना अभ्यासावर देखील परिणाम होतो. मात्र, सकस आहार घेत चांगला अभ्यास करण्याबाबत त्यांनी विविध कानमंत्र विद्यार्थ्यांना दिले.

त्या पुढे म्हणाल्या कि, स्पर्शज्ञान हि आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यामुळे शाळेत, कुटुंबात किंवा समाजात वावरताना कुणी चुकीचा स्पर्श केल्यास पालक, शिक्षक किंवा डॉक्टरांना सांगावे असा मोलाचा सल्लाही मुलांना दिला. मुलांशी प्रश्नोत्तरे करत अतिशय खेळीमेळीत मार्गदर्शन झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.

सुरुवातीला सर्व विद्यार्थी एकत्र बसवून मार्गदर्शन केले व त्यानंतर मुलींना स्वतंत्र वर्गात बसवून मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समज-गैरसमज, किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, योग्य आहार, आरोग्याशी निगडित समस्या यावर डॉ. करंबे यांनी माहिती दिली.

यावेळी इयत्ता आठवी ते दहावीची शंभरहून अधिक विद्यार्थी होते. डॉ करंबे यांचे स्वागत हे शाळेच्या शिक्षिका प्रतिशा मोकल आभारप्रदर्शन हे शिक्षिका सुवर्णा डोळस यांनी केले. यावेळी शाळेचे शिक्षक दर्शन गावंड व अर्जुन वीरकर हे देखील उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!