• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये एनएमएमटी बसथांब्यांना उतरती कळा

ByEditor

Feb 11, 2025

घनःश्याम कडू
उरण :
उरणमध्ये बंद झालेली एनएमएमटी बस पुन्हा काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असली तरी प्रवाशांना बस स्थानकांवर उघड्यावर उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे उभारण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

रखरखत्या उन्हात प्रवास करणार्‍या उरणमधील प्रवाशांना एनएमएमटी बसेसच्या प्रतीक्षेत उन्हात उभे राहण्याची शिक्षा मिळत आहे. उरणमधील एनएमएमटीच्या बस थांबे उभे करण्याचे काम काही वर्षांपूर्वी सुरू होते. त्यानंतर काही कारणास्तव बस सेवा बंद करण्यात आली होती. बंद पडलेली बस सेवा काही महिन्यानंतर पुन्हा सुरू झाली आहे. परंतु बस थांबे उभारण्याचे अर्धवट असलेले काम कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे. निवारा शेड नसल्याने भर उन्हात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बस थांबे हे दुभाजकांवर एक खांब ठोकून त्याला बस क्रमांकांची पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. तरी अद्ययावत बस थांबा उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही सकारात्मक पावले उचलली न गेल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उरण जवळच अनेक महाविद्यालये आणि शाळा आहेत. येथील शेकडो विद्यार्थी आणि प्रवासी दरदिवशी या थांब्यावरून एनएमएमटी व एसटी बसने प्रवास करत असतात. मात्र, येथील बस थांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना मागील अनेक वर्षे उन्हाळ्यात व पावसाळ्यात ताटकळत बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बस थांब्यावर आसन व्यवस्थेची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांनादेखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेता स्थानिकांच्यावतीने या जागेवर अद्ययावत बस थांबा उभारून तेथे निवारा शेड आणि बैठक व्यवस्थेची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!