घन:श्याम कडू
उरण : तलासरी नगरपंचायत अती दुर्गम भागातील, जिल्हा पालघर येथील कंत्राटी कामगारांचा पगार ८००० रुपये ऐवजी १९६१० रूपये करण्यात आला असून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या प्रयत्नांना प्रचंड यश आले आहे.
नव्या निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ातील नगरपरिषद, नगरपंचायतमधील कायम कंत्राटी कामगारांनी म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सदस्यत्व स्वीकारले आणि त्यावेळी या कंत्राटी सफाई कामगारांना मासिक वेतन फक्त रू. ८०००/- दिले जात होते. युनियनच्यावतीने कायद्यातील तरतुदीनुसार किमान वेतन ईतर भत्त्यांसह मिळालेच पाहिजे या कायदेशीर मागणीकरिता कामगार आयुक्त कार्यालय पालघर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. काल दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यावर सुनावणी होती. आज या सुनावणीमध्ये कंत्राटी कामगारांच्या पगारात भरघोस वाढ करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे कुशल कामगांराला रु. 22154/-, अर्धकुशल कामगारांना रु. 21024/- ,अकुशल कामगाराला रु. 19334/- वेतन मिळणार आहे. तसेच पगारात शासन निर्णयानुसार भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय विमा योजनेचा सुध्दा अंतर्भाव असणार आहे. ही सुनावणी सहाय्यक कामगार आयुक्त पालघर दिनेश दाभाडे यांच्या दालनात पार पडली. यावेळी तलासरी नगरपंचायतीच्यावतीने प्रशाकिय अधिकारी वैभव जाधव व लेखापाल साहिल सावंत, ठेकेदार किशोर साळुंके तसेच युनियनकडून ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, पालघर जिल्हाप्रमुख सचिन रसाळकर व अन्य कार्यकर्ते यांनी कामगारांची बाजू कायदेशीर बाबींच्या आधारे खंबीरपणे मांडली. त्यावेळी कर्तव्यदक्ष सहाय्यक कामगार आयुक्त दिनेश दाभाडे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली. त्यामुळे कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला. या गोरगरीब कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
तलासरी नगरपंचायतीमधील कामगारांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला आणि म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करताना पालघर जिल्ह्यातील तलासरी या कोकणाचे पश्चिमेकडील टोकाला असलेल्या अती दुर्गम भागातील कष्टकरी, गरीब, वंचीत कामगारांसाठी आपण न्याय देण्यासाठी वारंवार येऊन न्याय दिल्याबद्दल अंतःकरणापासून समाधान व्यक्त करताना सर्व कामगारांचे डोळे आनंदाने पाणावले होते.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी कामगारांना सांगितले की, आम्ही एक युनियन प्रतिनिधीने जे कर्तव्य पार पाडले पाहिजे तेच केले आहे. तेच आमच्या म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे धेय्य आहे. या निर्णयाबद्दल बोलताना आयुक्त तथा संचालक मनोज रानडे, सहाय्यक कामगार आयुक्त दिनेश दाभाडे, तलासरी नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष, मुख्याधिकारी श्री. माने, लेखापाल वैभव जाधव आणि ठेकेदार किशोर साळूंके यांचे आभार व्यक्त करून पुढील काळात असेच कामगार कल्याणासाठी आभार व्यक्त केले.