घन:श्याम कडू
उरण : उरण येथे गोरक्षक सिद्धेश शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये विक्रसाठी आणलेले १२० किलो गोमांस पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उरण पोलीस ठाण्याच्या सहकार्याने करण्यात आली.

गोरक्षक सिद्धेश शिंदे यांनी एका रिक्षामधून गोमांस वाहतूक करत असल्याच्या माहितीवरून रिक्षातील मालाची तपासणी केली. तपासणी दरम्यान रिक्षामध्ये १२० किलो गोमांस आढळून आले. याबाबत उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. उरण कासमभाट येथील एका महिलेने हे मांस विक्रीसाठी आणल्याचे सांगण्यात आले आहे. महिलेकडून हा व्यवसाय मागील ४० वर्षांपासून करण्यात येत असल्याचे समजते. दरम्यान, महिलेने विक्रीसाठी आणलेले मांस हे गाईचे नसून म्हैशीचे असल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून सदर मांसाचे नमुने घेऊन मांस नक्की कसले आहे हे जाणून घेण्यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच मांसाच्या प्रकाराबद्दल अधिकृत माहिती मिळेल.
मांस वाहतुकीसाठी परवाना नसताना मांस वाहतूक केल्याप्रकारणी रिक्षा चालक अफझल खान याच्यासह रिक्षा देखील ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत विनापरवाना रिक्षातून मांस वाहतूक करणे, विनापरवाना विक्री करणे, भरवस्तीमध्ये घरातून मांस विक्री करणे, गोवंश हत्या या गुन्ह्या अंतर्गत कारवाई होऊन रिक्षा चालक तसेच ४० वर्षे विना परवाना मांस विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई व्हावी अशी मागणी गोरक्षक सिद्धेश शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केली आहे.