तळवली येथील ग्रामस्थांना मिळणार दिलासा?
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने ठेकेदाराच्या मनमानीमुळे दिवसेंदिवस मार्गालगत असलेल्या ग्रामस्थ नागरिकांची डोकेदुखी वाढत असल्याने ठेकेदाराच्या गलथान कारभारावर तळवली तर्फे दिवाळी येथील ग्रामस्थ नागरिकांची गेली बारा वर्षे काम रखडल्याने मोठी हेळसांड होत असून ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. येथील पादचारी उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोड त्याचबरोबर त्याला जोडला गेलेला गावाकडे जाणारा मार्ग याचे काम अर्धवट असल्यामुळे अनेकदा शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत शनिवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी युवा नेते तथा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी येथील कामाची पाहणी केली.

पाहणी दरम्यान येथील कामासंदर्भात पादचारी उड्डाण पूल तसेच गावाला जोडला गेलेला रस्ता, त्याला जोडली गेलेली गटार लाईन या कामात कोणतीही हयगय करू नका, काम करत असताना ग्रामस्थांच्या घरांना धोका होणार नाही याची दखल घेऊन तसेच त्यांना विचारात घेऊन येथील कामे करा असा इशारा उपस्थित ग्रामस्थांसमोर अनिकेत तटकरे यांनी कल्याण टोल कंपनीचे उपस्थित अधिकारी आणि ठेकेदार यांना दिला.
येथील ग्रामस्थांच्या अनेक समस्या आहेत. मार्गावर ग्रामस्थांसाठी बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे काम गेली अनेक वर्ष अर्धवट स्थितीत आहे. तसेच ठिकठिकाणी खोदून ठेवलेली माती बारा वर्षाहून अधिक काळ तशीच असल्याने ग्रामस्थांना धुळीचा सामना करावा लागत आहे. आधीच्या ठेकेदारांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे अथवा काम करण्यासाठी वापरात आलेल्या ब्रेकर मशीन साधनांमुळे काही घरांना तडे गेले असून काही घरांची कौले फुटली आहेत. याबाबत अनेकदा शासन दरबारी हेलपाटे मारावे लागले, मात्र अद्याप त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कवडी मोल किंमतीत जागा हस्तांतरित केल्या असून त्याचा पुरेसा मोबदला देखील स्थानिकांना मिळाला नाही. अशा समस्या ग्रामस्थांनी अनिकेत तटकरे यांच्या समोर मांडल्या. गावाला पादचारी पुलाखालून जोडण्यात येत असलेला मार्ग हा धोकादायक होणार असल्याची व्यथा सांगत बहुतांश अडचणी ग्रामस्थानी मांडल्या. त्याचे निवारण करत या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन यावर चर्चा करून जसे योग्य वाटेल तसे काम करावे, कामे रखडवू नये, कोलाड इंदापूर दरम्यानच्या कामात गती येईल तसेच काम करत असताना ग्रामस्थांच्या घरांना धोका निर्माण होणार नाही याची अधिक दक्षता सदरच्या ठेकेदारांनी घ्यावी असा इशारा यावेळी युवा नेते अनिकेत तटकरे यांनी दिला.
यावेळी युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, संजय राजिवले, कल्याण टोल कंपनीचे अधिकारी धर्मेंद्र पाटीदार तसेच ठेकेदार, तळवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयेश घावटे, दिगंबर घावटे, कुलदिप सुतार, प्रफुल्ल घावटे, अशोक घावटे, संजय तेलंगे, अशोक घावटे, प्रकाश चौधरी, सुभाष घावटे, महेंद्र पानसरे, राजेंद्र पानसरे, विलास तेलंगे, संतोष घावटे, सौरभ वडे आदी ग्रामस्थ तथा महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
आम्हा ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत अर्धवट कामांची युवा नेते अनिकेत तटकरे यांनी पाहणी केली यामुळे नक्कीच आम्हा ग्रामस्थांना दिलासा मिळेल यात शंका नाही. तसेच महामार्गाचे काम करण्यास आम्हा ग्रामस्थांचा कोणताही ठेकेदाराला अडथळा नाही. बांधण्यात आलेला पादचारी उड्डाण पूल, त्याला जोडण्यात आलेला रस्ता, सर्व्हिस रोड, गटारे, या कामात असंख्य त्रुटी असून त्याकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने काम करत असून कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम करत आहे. मागिल ठेकेदार यांनी काम करत असताना ज्या मशिन वापरल्या त्यामुळे ग्रामस्थ प्रफुल्ल घावटे यांच्या घराला असंख्य तडे गेले. त्याची त्यांनी अनेकदा नुकसान भरपाई मिळावी म्हणून पाठपुरावा केला. पेण प्रांत अधिकारी यांनी देखील पत्र काढले मात्र त्याची दखल आजतागायत कोणीही घेत नाही. त्यामुळे येथे पुन्हा काम करण्यासाठी येथील ग्रामस्थांच्या समस्येचे निवारण करून कामे करण्यात यावी.
-जयेश घावटे
उपसरपंच, तळवली तर्फे दिवाळी