विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील खोपटे-धसाखोशी येथील उत्कर्ष उत्तम ठाकूर याची वयाच्या २१व्या वर्षीच महाराष्ट्र पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल या दोन्ही विभागात निवड झाली आहे. लहानपणीच आपल्या मनाशी खूणगाठ बांधत देश सेवेचं स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या उत्कर्ष याने अत्यंत कठीण काळात या दोन्ही विभागात मोठी कामगिरी करत आपली छाप सोडली.
वडील घर बांधण्याचे काम करतात. घराची परिस्थिती बेताची असताना सुद्धा दहावी आणि बारावी परीक्षेत चांगले गुण असताना सुद्धा फक्त देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा उत्कर्ष याने बेलापूर येथे श्री करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेवून आपला सराव चालू केला. कोरोना काळात बस उपलब्ध नसतानाही पहाटे लवकर उठून तो टाउनशिपपर्यंत चालत जात असे. पण तो थांबला नाही. थकला नाही. आणि सरते शेवटी त्याने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि संयम बाळगत महाराष्ट्र पोलीस मुंबई विभाग तसेच राज्य राखीव पोलीस दल यामध्ये त्याची निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल पंचक्रोशितून त्याचे अभिनंदन होत आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उत्कर्ष ठाकूर याचे अभिनंदन केले आहे.