साधना कंपनीच्या जुलूमशाहीविरोधात मोठ आंदोलन उभं करू -अशोक निकम
महेश मोहिते
रोहा : औद्योगिक वसाहत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आलेली आहे. धाटाव एम.आय.डी.सी मधील मग वायूप्रदूषणाचा विषय असो,प्रदूषित पाण्याचा विषय असो, एम.आय.डी.सी अंतर्गत कंपनीतील पाणी चेंबरद्वारे सी.ई.टी.पी मधे प्रक्रिया करण्यात होत असलेला ढिसाळपणा असो, स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा विषय असो,त्यांना कमी पगारात राबवून त्यांची आर्थिक कोंडी करणे असो किंवा मग कामगारांना जुलमीपध्दतीने कंपनीतून काढून टाकण्याचा विषय असो.अशा अनेक विषयात धाटाव औद्योगिक वसाहत नेहमीच अव्वल राहिलेली आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार साधना कंपनीतील कामगाराचा पगार चक्क दोन दोन महिने थकवला जात असल्याचे भीषण वास्तव समोर आलेले आहे. कंपनी राबवित असलेल्या या नव्या जुलमी कामगार धोरणामुळे कामगारांना आयुष्यातून मुळासकट उपटून टाकण्याचा खेळ तर कंपनी खेळत नाही ना.? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.आधीच अनेक कंपन्या बहुतांशी कामगारांना कमी पगार देऊन राबवून घेत आहेत,त्यात अवेळी दिला जाणारा पगार यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या कामगारांनी नेमकं कराव तरी काय? अलीकडेच साधना नायट्रो केम कंपनीने कोट्यावधी रुपयाची उलाढाल केली.त्यामुळे एकीकडे कंपनी तुपाशी..अन् कामगार दोन दोन महिने पगाराविना उपाशी.. अस काहीस चित्र दिसत आहे.
कंपनीच्या या जुलमी धोरणाविरोधात भारतीय मजदुर संघ रायगड जिल्हा सचिव अशोक निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ते म्हणाले की, एकीकडे कोट्यावधीची उलाढाल करणारी साधना नायट्रो केम कंपनी आणि दुसरीकडे दोन दोन महिने पगार,बोनस थकवून कामगारांची आर्थिक कोंडी करणारी मुजोर साधना कंपनी प्रशासन. कामगारांचे पगार वेळेत द्यावेत अशी तरतूद असतानादेखील कामगारांना पगारासाठी महिनोन्महिने वेठीस धरणाऱ्या साधना कंपनीच्या गलथान कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.तसेच कोट्यावधीचा व्यवहार करून कामगारांची पिळवणूक साधना कंपनीने करू नये अन्यथा भारतीय मजदुर संघाच्यावतीने भविष्यात कामगारांसाठी मोठा आंदोलन उभे करण्यात येईल याची नोंद कंपनी प्रशासनाने घ्यावी असा इशारा अशोक निकम यांनी दिला आहे.