अमूलकुमार जैन
अलिबाग : म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील यांनी त्यांचे अधिकारात व शासन नियमानुसार दिनांक २४ जुलै २०२३ रोजी दु. ११.३० वाजता ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभा सुरु असताना पांगलोळी येथील ग्रामस्थ अझहर निजामुद्दीन धनसे व मुजाहीद निजामुद्दीन धनसे (राहणार-पांगलोळी, तालुका – म्हसळा, जिल्हा – रायगड) यांनी संगनमत करुन ग्रामसभेत उपस्थित राहुन व्हिडिओ चित्रफित काढली तसेच प्रशासक पाटील यांना धमकी देत, ग्रामस्थांसमक्ष चोर बोलुन लोकांना सभेतून जाण्यास भाग पाडले. अशा प्रकारे आरोपी यांनी शासकीय कामात अडथळा आणुन फिर्यादी आणि प्रशासनाची बदनामी केली म्हणुन फिर्यादी गणपती मच्छिंद्र केसरकर (वय वर्षे ४८, मुळगाव घारगाव,करमाळा,सोलापूर सद्या वास्तव्य चोचे बिल्डिंग म्हसळा) यांनी दिनांक २६ जुलै २०२३ रोजी म्हसळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींवर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा रजि.नं.९५/२३ भा.द.सं.कलम ३५३,५००,५०६,३४ सह क्रिमिनल लॉ.अमेडमेंट चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे माहिती पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी दिली.
म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी अझहर निजामुद्दीन धनसे याला मुंबई येथून तर मुजाहीद निजामुद्दीन धनसे याला म्हसळा येथून अटक केले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 ऑगस्ट2023 पर्यंत पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. अधीक तपास पोलिस उप निरीक्षक डी. व्ही. एडवळे हे करीत आहेत.