म्हसळा : आंतरराष्ट्रीय महिला दिनालाच महिलेवर प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीनं आपल्या मित्रासोबत पत्नीवर प्राणघात हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावात घडली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीनं आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी मित्राच्या मदतीनं प्राणघातक हल्ला केला आहे. महिला घरात कपडे धुवत असताना तिच्यावर हल्ला केला आहे. हल्ला करण्यासाठी पतीनं आणि त्याच्या मित्रानं लाकूड आणि सक्रू ड्रायव्हरचा वापर केला आहे. पहिले पतीनं पत्नीच्या डोक्यात लाकडाने वार केले. नंतर हातावर देखील वार केले. लाकडानं जबर मार दिल्यानंतर त्याच्या मित्रानं सक्रू ड्रायव्हरचा हल्ला करण्यासाठी वापर केला. मित्रानं महिलेच्या गळ्यावर दोन ते तीन वेळा स्क्रू ड्रायव्हरने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात महिला जखमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी पती दुर्वेश धाडवे आणि त्याच्या मित्राविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीनं हा हल्ला नेमका कशासाठी आणि का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.
