• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील वनखात्याच्या डोंगरात आगीचा डोंब उसळला; वन विभागाचे दुर्लक्ष

ByEditor

Mar 10, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
उरण तालुक्यातील इंद्रायणी टेकडीवर तसेच वनखात्याच्या डोंगरात आगीचा भडका उडण्याची घटना (दि. ९) रात्रीच्या अंधारात घडली आहे. या घटनेकडे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने डोंगरातील सुक्ष्म जीव, पशुपक्षी, वन्य प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वनविभागाच्या सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षितपणामुळे असुरक्षित झालेले उरले सुरलेले वनक्षेत्र या आगीने भस्मसात होण्याच्या मार्गावर आहेत.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी टेकडीवर तसेच कळंबुसरे, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील वन विभागात आगीचे लोट दिसू लागल्याने काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या ठिकाणावरील आगीची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी जाणे टाळले. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेकडो लहान मोठी झाडे भस्मस्थानी पडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी सुक्ष्म जीव, पशुपक्षी व वन्य प्राणी होरपळून मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींकडून मिळत आहे.

सध्या उरण तालुक्यातील अनेक डोंगर वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे काळवटू लागले आहेत. त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. तरी वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील डोंगर टेकड्या वाचवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!