चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे तिढा सुटता सुटेना
कोलाड, इंदापूर, माणगावमध्ये चक्का जाम
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड, इंदापूर. माणगावमध्ये ५ ते ६ किलोमीटर अंतरावर गेली चार ते पाच दिवसापासून वाहनांच्या लांबच लांब लागल्या असून महामार्ग जाम झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे प्रवाशी वर्गाचा मोठा खोळंबा होत असल्याचे दिसून येत असुन कोलाड, इंदापूर, माणगाव तसेच संपूर्ण रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळीनिमित्त लाखोच्या संख्येनी चाकरमानी बुधवार, दि. १२ मार्चपासून आपापल्या गावी निघाले तर काही होळीनंतर पालखीसाठी गावाकडे निघाले आहेत. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त असंख्य शिवप्रेमी रायगडाकडे निघाले असून चाकरमानी होळी साजरी करून परतीच्या प्रवासाला लागले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेली १८ वर्षांपासून सुरु असुन हे काम आद्यपही अर्धवट स्थितीत आहे. या मार्गावरील नागोठणे, कोलाड येथील उड्डाण पुलाचे काम अर्धवट आहे, तसेच इंदापूर, माणगाव येथील बायपास रस्त्याचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. याबरोबर रस्त्याचे कामही अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे कामामुळे कोकणात येणाऱ्या असंख्य चाकरमान्यांना याचा त्रास होत आहे.
रायगड पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली असुन नागोठणे, वाकण, सुकेळी, कोलाड, इंदापूरपासून महाडपर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नाने वाहतूक कोंडी सुरळीत केली जात आहे. परंतु यासाठी प्रवासी वर्गाची साथ ही महत्वाची आहे, कारण प्रवासी वर्ग एकाच रस्त्यावरून तीन ते चार रांगा लावत असल्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास विलंब होत आहे.
नितीन मोहिते
सहाय्यक पोलिस निरीक्षक, कोलाड
