दिघी-पुणे प्रवास करणाऱ्या पर्यटकांची कार पेटली, जीवितहानी टळली
गाडीतील मौल्यवान वस्तू जाळून खाक
सलीम शेख
माणगाव : दिघी ते मुळशी मार्गावर प्रवास करत असलेल्या पर्यटकांच्या जॅग्वार कारने अचानक पेट घेतल्याची घटना ता. १६ मार्च रोजी रविवारी दुपारी घडली. सुदैवाने गाडीत प्रवास करणाऱ्या पाचही पर्यटकांना वेळेत बाहेर पडता आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीतील महत्त्वाचे सामान, लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू आगीत जळून खाक झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील चांदोरी गावचे हद्दीत दिघी ते पुणे राज्य मार्गावर घडली. घटनेची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात समजताच नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली.
दरम्यानच्या काळात या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहने रस्त्या कडेला उभी केल्यामुळे दोन्ही दिशेने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची हकीकत अशी की, सुनील पवार राहणार ताथोडे, मुळशी पुणे हे त्यांची पत्नी व ३ मुलीसह हे आपली कार क्र. एमएच १४ ईएम २४०० जागवार कार ने दिघी ते मुळशी पुणे असा प्रवास करीत असताना चांदोरे गावचे हद्दीत अन्नपूर्णा हॉटेल समोरून जात असताना त्यांचे जागवर कारणे अचानक पेट घेतला. ही घटना सुनील पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कार रस्त्याच्या बाजूला उभी करून ताबडतोब या गाडीतून पाचही पर्यटक प्रवासी उतरले. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही कार गाडी पूर्णपणे जळाली असून या गाडी मधील लॅपटॉप, मोबाईल फोन या सह विविध वस्तूंचे जळून नुकसान झाले.
प्राथमिक माहिती नुसार, गाडी चालू असताना कारमधून अचानक धूर येऊ लागला हे वाहनचालकाच्या तात्काळ लक्षात येताच ही कार रस्त्याच्या कडेला उभी केली, परंतु काही क्षणातच गाडीने पेट घेतला. पर्यटकांनी तत्काळ गाडी बाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच या मार्गावरून जाणारे येणाऱ्या प्रवासी, तसेच परिसरातील गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे टँकर ताबडतोब बोलवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही अंशी यश मिळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित घटना म्हणून करण्याचे काम उशिरापर्यंत माणगाव पोलीस ठाण्यात चालू होते. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे.
