घन:श्याम कडू
उरण : गेली अनेक वर्षे नियमित मिळणारा पाणीपुरवठा बंद केल्याच्या निषेधार्थ आणि न्यायासाठी परदेशी कुटुंबातील ८९ वर्षीय अनंत रामजीवन परदेशी हे सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
परदेशी कुटुंब गेल्या ३८ वर्षांपासून हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत हद्दीत राहत आहे आणि तेथील कायदेशीर करदाते व मतदार आहेत. मात्र, ग्राम आरोग्य पाणीपुरवठा समितीने त्यांच्या घराचा पाणीपुरवठा बेकायदेशीरपणे बंद केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासन कारवाई करत नसल्याने परदेशी कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासनाने कुटुंबाला संयम बाळगण्यास सांगितले असले, तरी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासक, गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अनंत परदेशी यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांनी पोलीस कारवाईचे आदेश दिले असतानाही कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी, परदेशी कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे अनंत परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि परदेशी कुटुंबाने केली आहे.
