अब्दुल सोगावकर
सोगाव : कोकणात होळी सण हा प्रमुख सणांपैकी एक महत्वाचा सण मानला जातो, यावेळी नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारे चाकरमानी, व्यावसायिक ग्रामस्थ आवर्जून आपल्या गावी होळी साजरी करण्यासाठी येतात. त्यांच्या येण्याने गावात एक वेगळाच उत्साह व आनंद असतो. असाच काहीसा उत्साह अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील पंचक्रोशीत १३ मार्च रोजी होळी व १४ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी पाहायला मिळाला. गणेशोत्सवानंतर होळीनिमित्त गावे पुन्हा एकदा गजबजलेली दिसून आली. चोंढी पंचक्रोशीतील किहीम, चोंढी, बामणसुरे आदी भागात होळी व धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
धुलीवंदनाच्या दिवशी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगात रंगत आनंदाने वाजतगाजत गल्लोगल्ली जाऊन पोस्त घेतली. यावेळी लहान मुलांनी विविध वेशभूषा व सोंगे परिधान करून पिचकारी, रंगांचे फुगे, रंगांच्या बालदी आदींच्या साहाय्याने एकमेकांना रंग उडवत आपला व इतरांचा आनंद द्विगुणित केला, यामध्ये लहान मुली व महिला देखील तेवढ्याच उत्साहात सहभागी झाल्या होत्या. किहीम समुद्रकिनारी संध्याकाळपर्यंत परिसरातील लहान मुले, मुली, महिला व पुरुषांनी गर्दी करत पोहण्याचा आनंद लुटला, यावेळी समुद्रकिनारी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
धुलीवंदनाच्या दिवशी पहाटेपासूनच चिकन – मटणाच्या सर्वच दुकानांवर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती, यावेळी चिकन मटण विक्रेत्यांनी जास्तीच्या कामगारांच्या सहाय्याने होणाऱ्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केला. होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाणे तर्फे जागोजागी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच गावागावात गस्त देखील वाढविण्यात आली होती, एकंदरीतच होळी व धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता उत्सव आनंदात व शांततेत पार पडला.

