जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे वणव्यात ४८ घरे वणव्याच्या आगीत जळून खाक झाली. त्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळवून द्या यासाठी आज जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडने जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन दिले आहे.
इंदरदेव येथील डोंगरावर धनगर समाजाची ४८ घरे असून येथील डोंगराला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली असून या आगीत येथील संपूर्ण घरे जळून खाक झाली आहेत. या घरांचा तात्काळ फेर पंचनामा करून बेघर कुटूंबाना मदत मिळावी यासाठी आज जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडच्या वतीने जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात या कुटुंबांना तात्काळ मदत करून शासनाने त्यांना त्या ठिकाणी नवीन घरे बांधून द्यावीत आणि त्यांना तेथे रस्ता, पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदिसह दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ केंडे, सचिव राजू आखाडे, सहसचिव राया ढेबे, सदस्य चंद्रकांत केंडे, धावू आखाडे, रवी बोडेकर, लक्ष्मण मरगळा आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
