घनःश्याम कडू
उरण : तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असला, तरी स्थानिक नागरिक मात्र प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. तालुक्यातील राजकीय पक्ष आणि नेते अधिकार्यांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरत असल्याने उरणच्या विकासाला खीळ बसली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
उरणमध्ये शेती नष्ट होऊन मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणि प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना नोकर्या मिळण्याऐवजी परप्रांतीय मजुरांचा भरणा वाढत आहे. परिणामी, उरणच्या स्थानिक तरुणांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे.नागरिकांनी याविरोधात वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या असल्या तरी अधिकारी वर्ग त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्यांना केराची टोपली दाखवत आहे. विशेष म्हणजे, जो कोणी याविरोधात आवाज उठवतो, त्याला वेगवेगळ्या मार्गांनी दबवले जात आहे. तालुक्यातील राजकीय पक्ष आणि नेते अधिकार्यांकडे दाद मागतात, मात्र त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नेते आणि अधिकार्यांमध्ये असलेले ‘सलोख्याचे’ संबंध.राजकीय पक्षांतील बरेचसे नेते स्वतःच व्यवसायिक असल्याने गैरमार्गांचा वापर करून त्यांनी स्वतःची कामे अधिकार्यांकडून करवून घेतली आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गाशी असलेला हा संबंध बिघडू नये, म्हणूनच राजकीय मंडळी प्रशासनाविरोधात पाऊल उचलण्यास तयार नाहीत.
उरणमधील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसण्यामागे हेच राजकीय आणि प्रशासकीय साटेलोटे जबाबदार आहे. अधिकारी आणि नेत्यांमध्ये असलेल्या हितसंबंधांमुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींनी वेळीच जागे होऊन अधिकार्यांवर वचक ठेवण्याची गरज आहे. अन्यथा, प्रशासनाच्या मनमानीमुळे उरणच्या स्थानिक नागरिकांचे अस्तित्व धोक्यात येईल. विकासकामांना वेग देण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय नेतृत्वाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
