मिलिंद माने
महाड : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख खडबडून जागे झाले आहेत. शिवसैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तातडीची मीटिंग आयोजित केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या पराभवातून सावरण्यासाठी व येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा आपले राजकीय स्थैर्य संपादित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जगताप कुटुंबियांसमवेत जाऊ नये यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी व संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची रविवार, दि. २३ मार्च रोजी तातडीची मीटिंग आयोजित केली आहे.
१९४ महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शहर संघटना, संलग्न सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक यांची २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महाडमधील समृद्धी फ्लॉवर व्हॅली तळमजला येथे तातडीच्या मिटींगचे आयोजन केले आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहारी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दावणीला जाऊ नये यासाठी कंबर कसली असली तरी शिवसैनिकांमध्ये आधीच शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी विभागणी झाल्याने येणारा काळ जिल्हाप्रमुखांसाठी कसोटीचा असल्याचे बोलले जात आहे.
