अपुरे बसस्थानक बनली समस्या; प्रवाशांची गैरसोय
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील सर्वसामान्य जनतेला एसटी प्रवासासाठी निवारा शेड मिळावी. यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा संघर्ष केला. मात्र, उभारण्यात आलेल्या अपुऱ्या बसस्थानकाचे विस्तारीकरण न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर बोर्लीपंचतन येथे उभारण्यात आलेल्या बसस्थानकाचे लोकार्पण गतवर्षी करण्यात आले. मात्र, आजूबाजूच्या ४८ गाव खेड्यांतील प्रवाशांना या बसस्थानकाची सुविधा अपुरी पडत आहे. श्रीवर्धन आगाराच्या तब्बल ८४ बस या स्थानकाच्या परिसरात फेऱ्या मारत असल्याने प्रवाशांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. असे असताना निवारा शेड आठ – दहा प्रवाशांनी भरून जाते. त्यामुळे इतर प्रवाशांना एसटी ची वाट पाहताना रखरखत्या उन्हात चटके सोसावे लागत आहेत.
बोर्लीपंचतन शहर दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडलेले असून, विशेष बाब म्हणजे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने एसटी प्रवाशी संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या निवारा शेडचे विस्तारीकरण होऊन प्रशासनाने सुसज्ज अशा बसस्थानकात महिलांसाठी हिरकणी कक्ष, प्रवाशांसाठी सुलभ शौचालय, पाणपोई, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर सारख्या गरजेच्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.
बोर्लीपंचतन निवाराशेड ग्रामपंचायत अखत्यारित असल्याने महामंडळ कोणतेच हस्तक्षेप करू शकत नाही.
-महेबुब मनेर,
आगार प्रमुख, श्रीवर्धन.
बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात येईल. तसा ठराव घेण्यात येईल.
-चंद्रकांत धनावडे,
ग्रामस्थ.