अब्दुल सोगावकर
सोगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी अलिबाग तालुक्यातील किहीम येथील मशिदीत नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित सर्व बांधवांना मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई व त्यांचे सहकारी यांनी गळाभेट घेऊन गुलाबपुष्प व मिठाई देत रमजान ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मांडवा सागरी पोलीस निरीक्षक दिपक भोई यांनी मशिदीचे मौलाना यांचे सन्मानाची शाल देत त्यांना मिठाई देऊन सन्मानित केले, तसेच किहीम पंचक्रोशीतील उपस्थित मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग, पोलीस पाटील आणि किहीम विभागातील प्रतिष्ठित नागरिक संदीप गायकवाड, किसन गायकवाड व इतर समाजातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचे मुस्लिम बांधवांनी शाल, मिठाई देऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या. किहीम येथील मशिदीत रमजान ईद उत्साहात साजरी करण्यासाठी पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एकंदरीतच किहीम भागात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.