वृद्ध नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे
पेण: आरोग्य ही प्राथमिक गरजआहे आणि ती प्रभावीत होणे गंभीर बाब ठरते. असे असूनही पेण चावडी नाका येथील सरकारी दवाखाना गेले एक महिना बंद आहे. कारण म्हणजे, दवाखान्यातील डॉक्टरांच्या नियुक्तीत आलेला खोळंबा. त्यामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सखोल अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पेण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या गर्दीमुळे वयोवृद्ध नागरिकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, रक्तदाब, डायबिटीस आणि इतर गंभीर आजारांसाठी आवश्यक औषधांचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टींमुळे आरोग्याच्या सेवा मागील स्तरावर गेल्या आहेत. चावडी नाका येथील सरकारी दवाखाना स्थानिकांसाठी अत्यंत सोयीचा होता. तेथील डॉक्टर उत्तमप्रकारे रुग्णांची काळजी घेत होते. मात्र, येथील डॉक्टरांची बदली झाल्यानंतर नवीन डॉक्टरांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे चावडी नाका येथील दवाखाना बंद आहे आणि त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे.
वयोवृद्ध नागरिकांकडून मागणी होतआहे की, माणुसकीच्या नात्याने आणि आरोग्याच्या गरजांबाबत लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी. चावडी नाका दवाखाना पुन्हा सुरू करण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती लवकरात लवकर केली जावी, जेणेकरून नागरिकांना आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध होईल.