गरीब महिलेच्या जागेतील कुंपण तोडले; कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अमुलकुमार जैन
कर्जत : भिसेगाव येथे फातिमा चर्चमागे प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या चार ते पाच गुंडांनी तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या एका गरीब महिलेच्या मालकी जमिनीत बेकायदेशीर घुसून तिच्या जागेवर कब्जा करण्याच्या उद्देशाने प्रवेश करुन जमिनीत घातलेले लोखंडी तारेचे कुंपण तोडून टाकले. त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच घटनास्थळी त्या पिडीत महिलेला व असलेल्या साक्षीदार यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने कर्जत पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरी प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील मौजे भिसेगाव फातिमा चर्च मागे तक्रारदार पीडित महिला त्यांच्या मालकीची मौजे भिसे गावातील सिटीसर्वे नंबर ७६६ मधील ३१.६६ चौमी क्षेत्रफळाची मोकळी मिळकत जमीन आहे. सदर जमीनीला लोखंडी तारेचे कुंपण केले होते. दिनांक २१/३/२०२५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास १०० मीटर परिसरात सुरू असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सचे इमारतीचे काम पाहणारे चार ते पाच गुंड हे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या मालकीच्या मोकळ्या जमिनीत प्रवेश करुन लोखंडी तारेचे कुंपण तोडून मोठे नुकसान करीत होते. त्यावेळी तक्रारदार महिलेने व तिच्या पतीने विचारणा केली असता तेथे आलेला श्रीकांत नारायण पवार (रा. खारघर, नवी मुंबई) व संदीप यादव यांनी आम्ही प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सचे लोक आहे, तुमच्या सर्व प्राॅपर्टी जागेवर कब्जा करून आम्ही बिल्डिंग उभारणार आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. जर पोलीसांत तक्रार केली तर ठार मारू अशी धमकी दिली. पिडीत महिलेने ताबडतोब कर्जत पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दादागिरी करणारे गुंड श्रीकांत नारायण पवार, संदीप यादव (रा. भाडोत्री संस्कृती अपार्टमेंट), रोहन त्रिपाठी (रा. कुर्ला-मुंबई), इरशाद सिद्दीकी (रा. कर्जत) यांचेवर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. २८१/२०२५, भारतीय न्याय संहिता ३२४(४),३५२,३५१(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्निल येरुणकर हे करीत आहेत.