• Sat. Apr 5th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा आर्थिक बळ देणारा नेता द्या, अन्यथा आम्ही सक्षम आहोत”

ByEditor

Apr 1, 2025
संग्रहित

महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची भूमिका

मिलिंद माने
महाड :
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पराभवास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी अखेर विरोधकांशी संघर्ष करण्यासाठी मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा आर्थिक ताकद देणाऱ्या नेत्याला महाड विधानसभा क्षेत्रात पाठवा अन्यथा आम्ही आमच्या ताकदीवर समर्थ आहोत असा इशारा शिवसैनिकांनी नेत्यांना दिला आहे.

कोकणातील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील पराभव पदरी पडल्याने कोकणातील रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यातच खचलेल्या शिवसैनिकांना धीर देण्याऐवजी व त्यांना आर्थिक बळ देण्याऐवजी केवळ उपदेशाचे डोस देण्याचे काम मुंबईतील शिवसेना नेत्यांकडून व संपर्क नेत्याकडून होत असल्याने ग्रामीण भागातील कडवट व बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक मात्र संतप्त झाला आहे.

१९४ महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मात्र बावीस हजार मतांनी त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून भाजपाची वाट धरण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने १९४ महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला वालीच उरला नाही अशी स्थिती झाल्याने व या स्थितीला पक्षाचे मुंबईतील वरिष्ठ नेते कारणीभूत असून खचलेल्या शिवसैनिकांना धीर देण्याऐवजी उपदेशाचे डोस देणाऱ्या शिवसेना नेत्यांमुळे बाळासाहेबांचा कडवट व निष्ठावंत शिवसैनिक मात्र हतबल झाला आहे. मुंबईतील शिवसेना नेते व संपर्क प्रमुखांच्या पुढे केवळ आम्ही पायघड्या टाकून सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का? असा सवाल महाड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत झाल्याचे शिवसैनिकांमधून चर्चिले जात आहे.

मुंबईतील शिवसेना नेते व पदाधिकारी व संपर्कप्रमुख यांना कोकणात पाठवताना केवळ मुठी आवळणारा नेता मातोश्रीने पाठवू नये तर मतदार संघातील शिवसैनिकांना आर्थिक रसद व धीर देणारा नेता पाठवा अन्यथा आम्ही आमच्या ताकदीवर विरोधकांशी लढण्यास समर्थ आहोत अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केल्या. आपल्या भावना मुंबईतील शिवसेना नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना कळविण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने आगामी काळात कोकणात निष्ठावंत शिवसैनिक मुठी आवळणाऱ्या नेत्याला कोकणात विरोध करणार असल्याचे चित्र यापुढे पाहावयास मिळणार असून कडवट शिवसैनिकांच्या रोशाला या नेत्यांना आगामी काळात सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!