• Sat. Jul 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तापमानाचा पारा चढलेला असतानाच महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार?

ByEditor

Apr 2, 2025
संग्रहित

मिलिंद माने
महाड :
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत असतानाच महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका तापमानाचा पारा वाढत असतानाच व पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असताना या निवडणुकींची रणधुमाळी १९४ महाड विधानसभा मतदारसंघात होणार का? की पुन्हा एकदा लांबणीवर पडणार? असा प्रश्न सरपंच पदाच्या निवडणुकीस गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना पडला आहे.

महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी निवडणुका व ३८ ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रमाबाबत हरकती व सूचना या संदर्भातल्या निवडणुकीचा कार्यक्रम शासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील जानेवारी २०२४ पासून ३३ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट आहे. त्यातच लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका देखील लांबणीवर पडत आहेत. परंतु या निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व त्यावरील हरकती व काही ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकी संदर्भात कार्यक्रम तहसीलदार पातळीवर जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत मात्र ना राजकीय नेते सांगू शकत, ना प्रशासकीय अधिकारी सांगू शकत. यामुळे निवडणूक लढवणारे व गुडघ्याला बाशिंग बांधून असणारे सरपंच पदाचे उमेदवार मात्र संभ्रम अवस्थेत सापडले आहेत.

महाड तालुक्यातील प्रशासकीय राजवट असलेल्या ३३ ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे :

आंबे शिवतर, दाभोळ, जिते,कसबे शिवतर, कुंभे शिवथर, खर्डी, पांगारी रेवतळे, सव, सिंगर कोंड, आमशेत, वाकी बुद्रुक, आंबिवली बुद्रुक , आकले, भावे, दहिवड, कांबळे तर्फे महाड, किंजळोली बुद्रुक, कुंभारडे, निजामपूर, पाने, सादोशी, सोनघर, तेटघर, वाळण बुद्रुक, विन्हेरे, वलंग, वरंडोली, वसाप, चोचींदे, भोमजई, मुमुर्शी, पिंपळकोंड

या ३३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडणार आहेत. यातील विन्हेरे, भावे, कांबळे तर्फे महाड, किंजळोली बुद्रुक, सव, जिते, दाभोळ, चोचिंदे या ग्रामपंचायतींची सदस्य संख्या नऊ आहे तर उर्वरित ग्रामपंचायतींची सदस्य संख्या सात आहे. तर ३८ ठिकाणी सदस्यांच्या जागा रिक्त असल्याने त्या ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!