घन:श्याम कडू
उरण : शहरातील आनंदनगर येथे गिरिराज अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले पोस्ट कार्यालय इमारत धोकादायक झाल्याने अचानक बंद करण्यात आले. मात्र, या कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर झाले आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
हे पोस्ट कार्यालय अनेक वर्षांपासून गिरिराज सोसायटीच्या बी विंगमध्ये भाड्याने सुरू होते. इमारत जीर्ण व धोकादायक असल्याने उरण नगरपालिकेने वारंवार नोटिसा पाठवल्या होत्या. अखेर, काही दिवसांपूर्वी अंतिम नोटीस देत इमारत त्वरित खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, गेल्या दोन-तीन दिवसांत पोस्ट कार्यालय अचानक बंद करण्यात आले.
शासकीय सुट्टीनंतर कार्यालय सुरू होईल, या अपेक्षेने आलेल्या ग्राहकांना मात्र बंद दरवाजेच दिसले. कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा नवीन पत्त्याची माहिती उपलब्ध नसल्याने ग्राहक संभ्रमात पडले आहेत. यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकवर्गाने त्वरित नवीन पोस्ट कार्यालयाचा पत्ता जाहीर करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांची गैरसोय टळेल.