बोगस डॉक्टर शोध समितीची तालुकास्तरीय बैठक
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुका बोगस डॉक्टर शोध समिती मार्फत बुधवारी पंचायत समिती कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेला बोगस डॉक्टर नेमके कुणाला ठरवणार याच्यावर विस्तारित माहिती देण्यात आली. गटविकास अधिकारी माधव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तालुक्यातील ३३ खाजगी डॉक्टरांची उपस्थिती होती.
मागील दिवसात तालुक्यातील एका बोगस डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तरुणीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी संबंधित बोगस डॉक्टरविरुद्ध तक्रार होऊन करवाई करण्यात आली. याच अनुषंगाने श्रीवर्धन आरोग्य विभाग आता ॲक्शन मोडवर आला आहे. बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना आळा बसावा यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नारायणकर यांनी विविध उपचार पद्धती तसेच संबंधित नियम तथा अधिनियमावर उपस्थित डॉक्टरांबरोबर चर्चा केली.

यावेळी श्रीवर्धन येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरकडे डिग्री व रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असून कोणत्या डिग्रीला ऍलोपॅथी प्रॅक्टिस करायचे अधिकार कितपत आहेत हे सांगण्यात आले. तसेच पेशंट (OPD) रजिस्टर ठेवणे ही बाब अनिवार्य बाब आहे. शिवाय पेशंटला संदर्भित रिफर करतेवेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि तसे कारण केस पेपरवर उल्लेख करावे अशा सूचना देण्यात आल्या. यावरूनच बोगस डॉक्टर शोध समितीचे पुढचं पाऊल काय असेल याबाबत थोडक्यात खुलासा करण्यात आला. तरी तालुक्यातील गाव, शहरी भागात वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या डॉक्टरांनी आपल्याकडे असणाऱ्या प्रमाणित डिग्री आणि सर्टिफिकेट प्रमाणेच प्रॅक्टिस करावी असे स्पष्ट आव्हान समितीमार्फत करण्यात आले.
