• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमधील “आपला दवाखाना” आजारी!

ByEditor

Apr 3, 2025

ना पाणी ना वीज…डॉक्टरांनी काढला पळ!

मिलिंद माने
महाड :
शहरामध्ये मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आपला दवाखानाच आजारी पडला आहे. ज्या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला त्या ठिकाणी ना पाणी ना पुरेसा कर्मचारी वर्ग यामुळे हा दवाखाना गेली काही महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. दवाखाना सुरू झाल्यापासून याठिकाणी थेंबभर पाणी देखील आलेले नाही. ज्या डॉक्टरांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती त्या डॉक्टरांनी देखील पळ काढला आहे.

महाराष्ट्र शासनाने आपला दवाखाना ही संकल्पना सुरू करून गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अनेक ठिकाणी हे केंद्र सुरू करताना मोठा गाजावाजा देखील केला गेला. महाडमध्ये मे २०२३ मध्ये प्रत्यक्षात दवाखाना सुरु करण्यात आला. तिथपासून साधारण ऑगस्ट २०२३ पर्यंत हा दवाखाना सुरू होता. त्यानंतर मात्र विविध कारणास्तव हा दवाखाना कोमात गेला आहे. आज याठिकाणी फक्त दोन ते तीन कर्मचारीच काम करताना दिसत आहेत. या दवाखान्याचा फायदा त्या त्या परिसरातील नागरिकांना होत असला तरी महाडमध्ये मात्र महिनाभरात आपला दवाखाना कोमात गेला होता.

महाड शहरामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाकडून नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील जुनी भाजी मंडई परिसरातील महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले तर दुसरे केंद्र शहरातील काजळपुरा भागात सामाजिक सभागृहामध्ये मंजूर झाले आहे. या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन झाले असले तरी काजळपुरा भागातील केंद्र सभागृहाच्या कामासाठी आजपर्यंत सुरू झालेले नाही.

शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यात हे केंद्र सुरू करण्यात आले होते. ज्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे त्या ठिकाणी केंद्र सुरू झाल्यापासून पाणीच आलेले नाही. या ठिकाणी रुग्ण तपासणी बरोबरच विविध प्रकारच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या देखील केल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे पाणी आवश्यक आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. येथे असलेल्या स्वच्छतागृहांना देखील पाणी नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. या ठिकाणी उद्घाटन करण्याच्या वेळेस वीज पुरवठा करण्यात आला होता, मात्र अवघ्या दोन दिवसातच हा विजापुरवठा खंडित झाला आहे. उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी वीज व्यवस्था नसल्याने लॅब तपासणीमध्ये अडथळा निर्माण होत आहे.

महाड बाजारपेठेत सुरू झालेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये दोन डॉक्टर, एमपीडब्ल्यू, एएनएम, सुरक्षारक्षक, एक परिचारिका अशी एकूण पाच पदे नियुक्त करण्यात आली होती. मात्र येथे रुजू झालेले डॉक्टर अवघ्या महिन्याभरात हे केंद्र सोडून आपल्या मूळ गावी रुजू झाल्याचे सांगण्यात आले. 11 महिन्याचा करार असताना देखील डॉक्टरांना कसे सोडण्यात आले आणि त्याच पदावर त्यांच्या गावी नियुक्ती कशी देण्यात आली हा एक प्रश्नच आहे. मात्र कंत्राटी करारनाम्यात तशी सूट असल्याचे महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर यांनी सांगितले. सद्यस्थितीत या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे आपला दवाखाना ओस पडला आहे. केवळ लॅब तपासणी सुरू असली तरी या ठिकाणी पाणी आणि वीज नसल्याने ही सेवा देखील ठप्प झाली आहे. काजळपुरा भागात ज्या ठिकाणी हे नागरिक आरोग्य वर्धिनी सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सभागृहाचे काम सुरू असल्याने अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. यामुळे गाजावाजा करून सुरू झालेला आपला दवाखाना अल्पावधीतच कोमात गेला आहे.

महाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना यामध्ये रुजू झालेले डॉक्टर अल्पावधीतच निघून गेले. शिवाय बिंदू नामावलीमुळे नवीन पदभरती न झाल्याने येथील पदांची संख्या रिक्त झाली आहे. येथील डॉक्टर त्यांच्या मूळ गावी गेल्याने दुसरा डॉक्टर मिळावा याकरिता पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-डॉ. नितीन बावडेकर
महाड तालुका आरोग्य अधिकारी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!