कर्जत : एका महिला प्रवाशाला स्टॉलवरून खरेदी केलेल्या वडापावमध्ये “साबणाचा तुकडा” सापडल्याची तक्रार आल्यानंतर मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावरील खाद्यपदार्थांचा स्टॉल बंद केला आहे. रशिदा इशाक घोरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील एका स्टॉलवरून वडापाव खरेदी केला आणि आत साबणाचा तुकडा पाहून तिला धक्का बसला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत स्टेशनवर असलेल्या 2 नंबर प्लॅटफॉर्मवरील व्ही. के. जैन टी स्टॉल नावाचे दुकान आहे. याठिकाणी चहा, कॉफी, वडापाव, भजीसह समोसा, इडली, सारखे नाश्त्याचे पदार्थ मिळतात. स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. मात्र एका प्रवासी महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आता हे दुकान बंद करण्यात आले आहे.
कर्जत स्टेशनवर असलेल्या व्ही. के. जैन टी स्टॉलवरुन एका महिलेने वडापाव घेतला होता. ही महिला खोपोलीला राहणारी असून या महिलेने तक्रार केली आहे की वड्यामध्ये बटाट्याच्या सारणात साबणाचा तुकडा होता. या महिलेने स्टेशन मॅनेजरकडे यासंदर्भात तक्रार केली होती. 1 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. या तक्रारीची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सदर स्टॉल बंद करण्यात आला आहे. या स्टॉलभोवती हिरव्या रंगाचे जाळीदार कापड लावून तो बंद करण्यात आला आहे.