• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जगताप कुटुंबियांचे महाडमध्ये ८ एप्रिलला शक्ती प्रदर्शन?

ByEditor

Apr 3, 2025

मिलिंद माने
महाड :
१९४ महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत २२,६१० मतांनी पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबीयांनी ताकद आजमावण्यासाठी ८ एप्रिल रोजी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवताना १९४ विधानसभा निवडणुकीत २२,६१० मतांनी पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असलेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने व बरोबर असलेले कार्यकर्ते भाजपामध्ये जाण्यास तयार नसल्याने अखेर जगताप कुटुंबीयांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत ‘गड्या आपला गाव बरा’ या म्हणी प्रमाणे स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.

मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये स्नेहल माणिकराव जगताप यांनी प्रवेश केला मात्र अचानकपणे झालेल्या प्रवेशामुळे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील संभ्रमावस्थेत होते. मात्र जगताप कुटुंबियांच्या प्रवेशाची पूर्वकल्पना १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली होती असे समजते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबियांबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते जाण्यास तयार नाहीत. यामुळे जगताप कुटुंबीय ताकद आजमावण्यासाठी ८ एप्रिल रोजी महाडमध्ये बैठकीचे आयोजन केले असले तरी या निमित्ताने जगताप कुटुंबीय शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

महाडमधील संत रोहिदास सभागृहामध्ये ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे बंधू हनुमंत (नाना) जगताप यांच्या उपस्थितीत संघटनात्मक चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे, तरी १९४ महाड विधानसभा मतदारसंघातील विभागातील व गावातील सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना जगताप कुटुंबियांनी दिल्या असल्या तरी यानिमित्ताने जगताप कुटुंब राष्ट्रवादीत जाण्यासाठी कार्यकर्त्यांची मनधरणी करणार असल्याचे बोलले जात आहे. या मेळाव्यानंतर विधानसभा निवडणुकीत जगताप कुटुंबीयांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडणुकीत पडलेली मते पाहता या मेळाव्यानंतर जगताप कुटुंबियांबरोबर किती कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जातात याचे चित्र स्पष्ट होईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!