मिलिंद माने
महाड : खरेदी केलेल्या जमिनीची सातबारावर नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी वरंडली येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला महाड येथे सापळा रचून लाच प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग येथील अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव नारायण महाडिक (राहणार खर्डी तालुका महाड) यांनी वरंडोली येथे सर्वे नंबर २९८ मधील ०.२२२० एवढे क्षेत्र ११/०२/२०२५ रोजी खरेदी केले होते. या खरेदीखताची नोंद करण्याची मागणी त्यांनी सुरज मोहनलाल पुरोहित तलाठी सजा चापगाव (अतिरिक्त कार्यभार) यांच्याकडे केली होती.
खर्डी येथील महादेव नारायण महाडिक यांनी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीवरून भगवान तेजराव मोरे मंडळ अधिकारी मंगरूळ (अतिरिक्त कार्यभार मंडळ अधिकारी नाते) व सुरज मोहनलाल पुरोहित तलाठी सजा चापगाव यांना ३००० हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी अलिबाग येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे निरीक्षक एस. व्ही. भिसे यांच्या पथकाने रंगेहात पकडले असून याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना खरेदी खताची नोंद सातबारावर करण्याप्रकरणी लाच घेताना पकडल्याने महाड महसूल विभागात खळबळ उडाली आहे.