अमुलकुमार जैन
अलिबाग : व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेब याचा फोटो व मजकूर ठेवल्याच्या आरोपावरुन तळा पोलीसांनी शोएब नौशाद खाचे या तरुणावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी शोएब याने दि. ३ एप्रिल दुपारी १२.२७ वाजण्याच्या सुमारास औरंगजेब याचा फोटो व त्याखाली आक्षेपार्ह असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटसअपवर ठेवला होता. दि. ३ एप्रिल रोजी व्हॉटसअपवरचे स्टेटस बघत असताना काहींनी तो स्टेट्स बघितला असता अनेकांच्या नजरेस ही बाब लक्षात आली. तो फोटो व मजकूर बघितल्यानंतर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातील याची जाणीव असताना व भारत देशात औरगंजेब याचे कोणतेही चांगले कार्य नसताना, त्याचे उदात्तीकरण व्हावे या उद्देशाने आरोपीने हे स्टेटस ठेवले आहे. ते पाहून हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल म्हणून, सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे हेतूने व्हॉटसअप स्टेटसला वरील पोस्ट प्रसारित झाला असल्याची माहिती तळा पोलिस ठाण्याचे प्रभारी सतीश गवई यांना समजताच आरोपीविरुद्ध तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी सांगितले की, दि. ३ एप्रिल रोजी तळा शहरातील खालचा मोहल्ला येथील शोएब नौशाद खाचे याने त्याच्या व्हॉट्सप मोबाईल स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो लावून दुपारी १२.२७ च्या सुमारास हिंदु आणि मुस्लीम समाजात जातीय तणाव निर्माण होईल असे स्टेटस ठेवले होते. इंग्रजीमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहून जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केली होती.
संदेश व्हायरल होताच तळा शहरात तणाव निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांसह त्याच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह मजकुराची पडताळणी केली. पंचनामा करून त्याचा मोबाईल जप्त करून आरोपीला देखिल ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊन होणारा अनर्थ टळला आहे. याबाबत भा.न्या.स.चे कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई करीत आहेत.
नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर समाजाच्या हितासाठी, सामाजिक एकोपा, बंधुभाव रहावा यासाठी करावा. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे सामाजिक शांतता बिघडत आहे. नागरिकांनी त्यांना आलेल्या संदेशावर, अफवांवर विश्वास ठेवू नये. सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर पसरवू नये
-पुष्कराज सूर्यवंशी
उपविभागीय पोलीस अधिकारी, माणगाव-रायगड.