ठाणे : अंबरनाथमध्ये कलिंगड विक्रीच्या नावाखाली सुरू असलेल्या लहान बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या सतर्कतेमुळे या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोबाईल तपासादरम्यान बाळांच्या विक्रीसंबंधी केलेली चॅटिंग मिळाल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली.
अंबरनाथ पश्चिमेच्या फॉरेस्ट नाका परिसरात कलिंगड विकणाऱ्या एका तरुणाला कचरा टाकण्यावरून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटकलं. यानंतर तो कलिंगड विक्रेता कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणाला वनविभागाच्या कार्यालयात बोलावून त्याने हा व्हिडिओ कुठे कुठे फॉरवर्ड केला आहे, हे पाहण्यासाठी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात लहान बाळांच्या खरेदी-विक्री संदर्भात केलेली चॅटिंग वनविभागाचे अधिकारी वैभव वाळिंबे यांना आढळून आली.
त्यानुसार त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलिंगड विक्रेता तरुण तुषार साळवे याच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी तुषार साळवे याला २०२३ मध्ये देखील ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याने तोच धंदा सुरू केला होता. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्याकडून सुरू आहे.
या प्रकरणामुळे बालकांच्या तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. एक किरकोळ कलिंगड विक्रेता अशा गंभीर गुन्ह्यात गुंतलेला असल्याचे उघड झाल्याने समाजमन हादरले आहे.