अनेक मान्यवरांनी घेतले श्रीरामाचे दर्शन
अनंत नारंगीकर
उरण : चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावामधील श्रीराम नवमी उत्सवाला सुमारे १५० वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. सध्याच्या मंदिरात जी प्रभु श्रीरामाची मुर्ती आहे ती मुर्ती अयोध्या नगरीतून चिरनेर मधिल पाडा व तेली पाडा ग्रामस्थांनी होडीतून वाजतगाजत मिरवणूक काढत आणली होती. या ऐतिहासिक मंदिरात रविवारी श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

परंपरेनुसार उरण तालुक्यातील चिरनेर, उरण शहर, फुंडे, दिघोडे, खोपटा, चिर्ले सह इतर गावांमध्ये श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातही श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा केला जातो. सदर मंदिरात विराजमान झालेली प्रभु श्रीरामाची मुर्ती ही चिरनेर गावातील मधिलपाडा, तेली पाडा ग्रामस्थांनी होडीतून श्रीरामाच्या जन्मभूमीतून अयोध्या नगरीतून वाजतगाजत मिरवणूक काढत आणली होती. तेव्हापासून मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ एकदिलाने श्रीराम नवमी जन्मोत्सव साजरा करत आहेत. आज या सोहळ्याला १५० वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. रविवारी या श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून नवीमुंबई परिसरातील यशस्वी उद्योजक राजाशेठ खारपाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा अर्चा करण्यात आली.

या श्रीराम नवमी जन्मोत्सवाचे औचित्य साधून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पोलीस पाटील संजय पाटील, सरपंच भास्कर मोकल, परिसरातील आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दाखवून श्रीरामाचे कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मधिलपाडा, तेली पाडा ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.