सलीम शेख
माणगाव : रायगड जिल्ह्यातील मानाच्या यात्रांपैकी एक यात्रा म्हणून किर्ती असलेल्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील श्री देव भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव यंदा शुक्रवार, 11 एप्रिल रोजी भरणार असून या यात्रेच्या उत्सव समिती अध्यक्ष पदी पत्रकार भारत गोरेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सर्व धर्म समभावाचे प्रतिक अशी ओळख असलेल्या गोरेगावमधील श्री देव भैरवनाथ महाराज यांची यात्रा यंदा शुक्रवार, 11 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. उंच बगाडावरती फिरणारी लाट या यात्रेचे खास आकर्षण आहे. पूर्वेकडील जंगलातून वतनदार मंडळी चालत खांद्यावरून लाट घेऊन येण्याची पंरपरा आहे. दुसऱ्या दिवशी ती लाट बगाडावरती चढवून फिरविण्यात येते. यावेळेस भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. यावर्षी रेपोली गावाच्या हद्दीत लाट असून गुरुवार, दि. 10 एप्रिल रोजी लाट आणली जाणार आहे. श्री देव भैरवनाथ यात्रेचे विशेष महत्व म्हणजे लाट फिरविण्या आधी यात्रेसाठी पिरबाबा यांना बोलाविण्याची प्रथा आहे. यासाठी खास पालखीमधून वतनदार मंडळी पिरबाबा यांना घेऊन येतात. यासह भिन्नाड गाव , कुरवडे व चिंचवली येथील सोमजाईची पालखी व सासणकाठी नाचविण्याची पंरपरा आहे.
नुकत्याच झालेल्या गावगाड्याच्या बैठकीत अठरापगड जातीतील नागरिकांसह विश्वस्त व वतनदार मंडळाची पंचायत सभा संपन्न झाली. यामध्ये 2025 सालाची यात्रा उत्सव समिती नियुक्त करण्यात आली. समितीच्या अध्यक्ष पदी पत्रकार भारत गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकारणीत किशोर तटकरे, राकेश दर्गे, उमेश लाड, अमोल पांचाळ, विरेंद्र मेहता, अनिकेत महाडिक, अशोक आंबेतकर, ओमकार गोरेगावकर, रूपेश पितळे, बाळा म्हशेलकर, अभिजित महाले, चैतन्य महाले, विशाल भुस्कुटे, यांचा समावेश करण्यात आला आहे.
ऐतिहासिक असणारी लाट गावात आणण्यापासून यात्रेचा छबिना पूर्ण होईपर्यंत यात्रेची पूर्ण जबाबदारी यात्रा उत्सव समितीवर सोपविण्यात आली आहे. महेंद्र पिसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या गावसभेला अशोक लाड, सुरेश लाड, हरेश शेठ, विनायक महाडिक, किरण तांबडे, नाना महाले, संदेश महाले, राकेश पोवळे, संजय पोवळे, सालकरी भाई पोवळे , अभिषेक पोवळे, रवी पोवळे, रोहिदास विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोरेगावकर, वतनदार दिलीप गोरेगावकर, प्रसाद गोरेगावकर, संधीर गोरेगावकर, सचिन आंबेतकर, ट्रस्टी दिलीप भिसे, गणेश यादव, गणेश खंडेलोट यांच्यासह पाटील राम गोरविले आदी उपस्थित होते.