मुंबईत ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादीत करणार प्रवेश
किरण बाथम
पनवेल : काँग्रेसच्या वरिष्ठांनी कोकणाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्यामुळे येथील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून या साऱ्या प्रकाराला कंटाळून काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती कमिटी प्रदेश उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वासह पदांचे नुकतेच राजीनामे दिले. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे कोकणात काँग्रेसला खिंडार पडणार आहे.
पनवेल व नवी मुंबईसह चिपळूण-रत्नागिरी येथील सुनिल सावर्डेकर काँग्रेसमध्ये कार्यरत असतांना पक्षात महत्त्वाची पदे भूषवली यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी उपाध्यक्ष पद तसेच कोकण विभागाचे प्रभारी म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. या पदाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत पक्ष संघटना वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
कोरोना, महापूर यासारख्या संकटमय काळात चिपळूणसह अन्य तालुक्यातील जनतेला तसेच काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महापूर काळात त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह गृहपयोगी वस्तूंचे वाटप करून पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता. तर दुसरीकडे लोकसभा विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्ग- रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देखील संधी मिळावी यासाठी वरिष्ठांकडे आग्रही भूमिका मांडली. मात्र, या भूमिकेकडे काँग्रेसच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गळचेपी झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे भूमिका देखील मांडली होती.
आता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करताना येथील काँग्रेस पदाधिकारी विश्वासात घेतले नसल्याचे त्यांना वैषम्य वाटले. काँग्रेसच्या वरिष्ठांनी नेहमीच कोकणाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणात पक्ष कसा वाढवायचा असा प्रश्न निर्माण झाला असून या साऱ्या प्रकाराला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वासह पदांचे राजीनामे दिले आहेत, अशी माहिती सुनील सावर्डेकर यांनी दिली असून आपण शेकडो काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ८ एप्रिल रोजी मुंबईत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती दिली.